लिथियम-निकेल प्रक्रिया प्रकल्पांसाठी केंद्राची २,८१४ कोटींची योजना; आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
देशात लिथियमचे दोन आणि निकेलचे दोन प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार; पात्र कंपन्यांना गुंतवणुकीवर ३० टक्क्यांपर्यंत भांडवली साहाय्य मिळणार.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या, ऊर्जा साठवणूक यंत्रणा आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. लिथियम आणि निकेलच्या प्रक्रिया प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने २,८१४ कोटी रुपयांच्या भांडवली साहाय्य योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत देशात लिथियमचे दोन आणि निकेलचे दोन असे एकूण चार प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांसाठी पात्र कंपन्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ३० टक्क्यांपर्यंत भांडवली साहाय्य दिले जाणार आहे. पाच वर्षांच्या या योजनेचा उद्देश महत्त्वपूर्ण खनिजांच्या प्रक्रियेसाठी भारताचे परदेशांवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
२०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत योजना
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. ही योजना आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवली जाणार आहे.
योजनेनुसार प्रत्येक लिथियम प्रक्रिया प्रकल्पाची किमान क्षमता ३० हजार टन, तर प्रत्येक निकेल प्रक्रिया प्रकल्पाची किमान क्षमता ५० हजार टन निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाणार; पक्षातील घडामोडींना वेग
लिथियम प्रकल्पासाठी ५०० कोटी, निकेलसाठी ९०० कोटींचे साहाय्य
लिथियम प्रक्रिया प्रकल्प उभारणाऱ्या प्रत्येक कंपनीला कमाल ५०० कोटी रुपयांचे भांडवली साहाय्य मिळू शकते. तर निकेल प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रतिकंपनी कमाल ९०० कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
लाभार्थी कंपन्यांची निवड दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपन्यांची तांत्रिक पात्रता तपासली जाईल. त्यानंतर आर्थिक बोलीच्या आधारे अंतिम निवड होईल. सरकारी साहाय्याची सर्वात कमी गरज असलेल्या कंपनीला प्राधान्य दिले जाणार आहे. निश्चित उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर साहाय्याची रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल.
इलेक्ट्रिक वाहन आणि संरक्षण उद्योगाला फायदा
या प्रकल्पांमध्ये लिथियम आणि निकेलच्या धातुकावर तसेच मध्यवर्ती उत्पादनांवर प्रक्रिया करून उच्च शुद्धतेची खनिजे तयार केली जाणार आहेत. निकेल प्रक्रियेदरम्यान कोबाल्ट हे उप-उत्पादन म्हणून मिळवले जाणार आहे.
लिथियम, निकेल आणि कोबाल्ट या खनिजांचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या, ऊर्जा साठवणूक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण उपकरणे आणि विशेष पोलाद उद्योगात केला जातो.
सध्या या खनिजांच्या प्रक्रियेसाठी भारताला परदेशांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे देशातच प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास महत्त्वपूर्ण खनिजांची उपलब्धता वाढण्यास आणि इलेक्ट्रिक वाहनांसह विविध औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळण्यास मदत होऊ शकते.




