राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाणार; पक्षातील घडामोडींना वेग
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटी आणि आमदारांची बैठक; अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणातील सीआयडी चौकशीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू असून पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणातील सीआयडी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर मांडावा, अशी मागणी आमदार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
बुधवारी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पक्षातील अलीकडच्या घडामोडी, नेत्यांमधील मतभेद आणि संघटनात्मक निर्णयांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.
झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम
मुंबईतील काही कार्यकर्ते आणि नेते नियुक्त्यांवरून नाराज असल्याची चर्चा होती. पार्थ पवार यांनी झिशान सिद्दीकी यांची आणि उमेश पाटील यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती. या नियुक्त्यांपूर्वी कोअर कमिटीला विश्वासात घेतले नसल्याचा आक्षेप काही नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जात होते.
मात्र, या नियुक्त्या कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती आहे. दोघांनाही पुढील सहा महिने काम करण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याचे समजते.
हेही वाचा – एकनाथ शिंदेंना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार; ‘धर्मध्वजाधारक’ उपाधीनेही गौरव
आमदारांनी मांडल्या अडचणी आणि नाराजी
देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीला 20 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी आपल्या अडचणी आणि मनातील भावना वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडल्याची माहिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेदांचा परिणाम स्थानिक पातळीवरील नेत्यांवर होत असल्याची भावना काही आमदारांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवाळीनंतर ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भेटीत अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणातील सीआयडी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी आमदार करणार असल्याचे समजते. याशिवाय महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबाबत काही तक्रारीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्या जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीतील या बैठकांमुळे महायुतीमधील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री भेटीचा अधिकृत तपशील आणि बैठकीतील चर्चेबाबत पक्षाकडून सविस्तर माहिती समोर आलेली नाही.




