‘उड्डाण ०.४’ राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल चमकले; पटकवले उपविजेतेपद!

पिंपरी | विशेष प्रतिनिधी
कला आणि संस्कृतीचा भव्य महोत्सव ठरलेल्या ‘उड्डाण ०.४’ या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत पिंपरी येथील आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेने एकूण विजेतेपदाच्या (Overall Title Trophy) शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावत आपल्या कलागुणांचा ठसा उमटवला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील ६ हून अधिक जिल्ह्यांतील १०० पेक्षा जास्त शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आरकेएल गॅलेक्सीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम तालबद्धता, सांघिक समन्वय आणि आत्मविश्वासाच्या बळावर उपस्थितांची व परीक्षकांची मने जिंकली.
हेही वाचा
‘अर्णब’नंतर ‘मुरासू’ वादळाने किनारपट्टी झोडपली; महाराष्ट्रातही हवामान बदलले
विविध नृत्यप्रकारांतील सुवर्णयश:
पाश्चात्त्य नृत्य (Western Dance) : इयत्ता तिसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऊर्जावान सादरीकरणाने द्वितीय क्रमांक पटकावला.
शास्त्रीय नृत्य (Classical Dance) : इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शास्त्रीय नृत्याविष्कार सादर करत तृतीय क्रमांकावर मोहर उमटवली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, नृत्यदिग्दर्शकांचे कुशल मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि पालकांचे प्रोत्साहन लाभले.
या यशाबद्दल बोलताना शाळा व्यवस्थापनाने सर्व विजेते व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि नृत्यदिग्दर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “शाळा केवळ शैक्षणिक प्रगतीवरच भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कलागुणांना वाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्तीची भावना अधिक दृढ झाली आहे,” असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला. या यशामुळे संपूर्ण आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल परिवारात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




