TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कर्जमाफीच्या यादीतून एकही शेतकरी वगळला जाणार नाही; बावनकुळेंचे आश्वासन

KYC अपूर्ण असलेल्या शेतकरी कुटुंबांची प्रक्रिया सुरू; दुष्काळी काळात सक्तीची वसुली केल्यास कारवाईचा इशारा

नागपूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या यादीतून एकाही पात्र शेतकऱ्याचे नाव वगळले जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. कर्जमाफीसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करून याद्या पाठवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

KYC अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू

प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे १० ते १५ हजार शेतकरी कुटुंबांची KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, हे खरे असल्याचे बावनकुळे यांनी मान्य केले. काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या मृत आई-वडिलांच्या नावावर बँक खाते असल्याने ते मुलांच्या नावावर करण्यासाठी वेळ लागत आहे.

मात्र, अशा तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी कर्जमाफीची योजना सरकार पूर्ण करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अमित शाह भेटीवर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याबाबतही बावनकुळे यांना विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या भेटीत उच्चस्तरीय बैठक झाली असेल. त्यामध्ये जे निर्णय झाले असतील, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून पुढील निर्णय घेतील.

हेही वाचा –  इम्रान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; ‘लीव्ह इंडिया’ नोटीसवरील स्थगिती ७ डिसेंबरपर्यंत कायम

बिश्नोई गँग धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपास

नागपूरमधील बिश्नोई गँगच्या धमकी प्रकरणावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या धमकीसंदर्भात पोलीस चौकशी करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सरकारकडून आवश्यक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी काळात सक्तीची वसुली करू नका

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून फायनान्स कंपन्या, पतसंस्था आणि खासगी बँकांकडून सक्तीची वसुली होत असल्याच्या तक्रारींबाबतही बावनकुळे यांनी भूमिका मांडली.

दुष्काळाच्या आठ महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या काळात शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव आणून त्यांना अडचणीत टाकू नये. सक्तीची वसुली होत असल्याचे आढळल्यास शासन म्हणून कारवाई केली जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईबाबत काय म्हणाले?

तुकाराम मुंढे यांच्या तपासणी आणि कारवाईसंदर्भात विचारले असता बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही दबावाखाली कारवाईला स्थगिती दिली जात नाही. काही वेळा कारवाईत तांत्रिक बाबी अपूर्ण राहिल्यामुळे स्थगिती मिळू शकते.

तुकाराम मुंढे यांच्या तपासणीत काही बाबी समोर आल्या असतील किंवा काही प्रक्रिया अपूर्ण राहिली असेल, त्यामुळे कारवाई थांबवण्यात आली असावी. त्यांच्या कामात कोणी हस्तक्षेप करत नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

OBC आरक्षणावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका

जिल्हा परिषद निवडणुकांमधील OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार हे नौटंकी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

२७ टक्के OBC आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गेले, असा दावा बावनकुळे यांनी केला. हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

२७ टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय होण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण ठेवून निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भूमिका मांडली असल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यानुसार सरकार तयारी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group