TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

 बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज; दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा.

मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर आता पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. शनिवारी या क्षेत्राचे केंद्र आग्नेय बंगालचा उपसागर, त्यालगतचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह आणि अंदमान समुद्राजवळ होते. रविवारी रात्री या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव वाढल्यास मंगळवारी सकाळच्या सुमारास ते १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान हे चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत आजपासून पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.

‘अर्णब’ चक्रीवादळानंतर राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची नोंद झाली होती. विशेषतः राज्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाचा प्रभाव अधिक होता. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, सांगली, अहिल्यानगर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश भागांत पाऊस झाला.

मागील दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. आता बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. दरम्यान, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात देशभरातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी व्यक्त केला आहे.

हेही वाचा –  अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठे इनकमिंग; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा पक्षप्रवेश

तापमानात चढ-उतार; पुढील दिवसांत वाढीचा अंदाज

पावसाळी हवामानामुळे कोकण आणि विदर्भातील कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. शनिवारी या प्रदेशांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने अधिक होते.

राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा २ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले जात आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने, तर किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रविवारी काही भागांत वादळी पाऊस, तर राज्यातील बहुतांश भागांत हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आज कुठे आहे वादळी पावसाचा यलो अलर्ट?

हवामान विभागाने रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

याशिवाय लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर घाट विभाग, सिंधुदुर्ग, सातारा, सातारा घाट विभाग, पुणे, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभागात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button