बोऱ्हाडेवाडी,शिवरोड,मोशीतील पाणीपुरवठ्यात दुजाभाव होत असल्याचा आरोप !
आर्थिक देवाणघेवाणीतून काही सोसायट्यांना जादा तर काहींना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार

– दोषींवर कठोर कारवाईसह संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीची हाउसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक २ मधील बोऱ्हाडेवाडी, शिवरोड आणि मोशी परिसरात पाणीपुरवठ्याच्या वितरणात दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून काही सोसायट्यांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा केला जात असल्याचे, तर काही सोसायट्यांना अत्यल्प व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच एकाच परिसरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली करावी,अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-
चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांना समान आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत नागरी हक्क आहे. मात्र, बोऱ्हाडेवाडी, शिवरोड आणि मोशी परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून गंभीर तक्रारी समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पाणीवाटपात समानता राखली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही सोसायट्यांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असताना, इतर सोसायट्यांना मात्र कमी दाबाने किंवा अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी-जास्त केले जात असल्याचा संशयही सोसायटीधारकांनी व्यक्त केला आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे असून, त्यांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दखल नसल्याची भावना
पाणीपुरवठ्यातील कथित अनियमिततेबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध, पारदर्शक आणि समन्यायी वितरण होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत काही सोसायट्यांना जादा, तर काही सोसायट्यांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पाणीवाटपाची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हेही वाचा – आंतरराष्ट्रीय अनुभव, जागतिक दर्जाचे कौशल्य महत्त्वाचे – डॉ. गोविंद कुलकर्णी

अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी
पाणीपुरवठा व्यवस्थेत पारदर्शकता आणि निष्पक्षता निर्माण करण्यासाठी एकाच परिसरात किंवा ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असलेल्या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली करावी अथवा नियमानुसार त्यांच्या नियुक्तीचा आढावा घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. पाणीवाटपाचे वेळापत्रक, प्रत्यक्ष पाणी सोडण्याची वेळ, सोसायट्यांना मिळणारे पाणी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची नोंद तपासून चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो सोसायटीधारकांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. अन्यथा, नागरिकांच्या आणि सोसायटीधारकांच्या पाणीहक्कासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, महापालिकेचे शहर अभियंता आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. आता महापालिका प्रशासन या तक्रारींची कितपत दखल घेते आणि पाणीपुरवठ्यातील कथित अनियमिततेबाबत कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील सोसायटीधारकांचे लक्ष लागले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी सोसायटीधारकांकडून केल्या जात आहेत. पैसे दिल्याशिवाय सोसायट्यांना पाणी सोडले जात नसल्याचा आरोप असून, पैसे देणाऱ्या सोसायट्यांना जास्त, तर पैसे न देणाऱ्या सोसायट्यांना कमी पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. इतकेच नव्हे, तर कचरा उचलण्यासाठीही पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पैसे दिल्यासच कचरा उचलला जात असल्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. या सर्व प्रकरणांत महापालिका आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि सोसायटीधारकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. अन्यथा, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर सोसायटीधारकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. त्यांच्या हक्कांसाठी चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही.”
— संजीवन सांगळे
अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन




