दिवाळीपूर्वी FDA ची मोठी कारवाई! १९.६९ कोटींचे मसाले जप्त; ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा भेसळखोरांना इशारा; १,०५७ मसाला आस्थापनांची तपासणी, दिवाळी संपेपर्यंत कारवाई सुरू राहणार

मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त आणि दर्जाहीन पदार्थांची विक्री करणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मसाले आणि मसालेजन्य पदार्थांच्या विक्रीशी संबंधित आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९.६९ कोटी रुपयांचे पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१,०५७ आस्थापनांची तपासणी; ९४ परवाने निलंबित
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मसाले आणि मसालेजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी FDA कडून विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत १,०५७ आस्थापनांवर कारवाई करून चौकशी करण्यात आली आहे. यापैकी ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ५५७ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या कारवाईत ११,९६३ क्विंटल मसाले आणि मसालेजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मालाची किंमत १९.६९ कोटी रुपये असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
गोडाऊन आणि कारखान्यांनंतर किरकोळ दुकानदारही रडारवर
मसाल्यांचा वापर रोजच्या स्वयंपाकात तसेच दिवाळीच्या फराळामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी गोडाऊन आणि कारखान्यांमध्ये तपासणी करण्यात आली आहे.
आता किरकोळ दुकानदारांसह इतर व्यावसायिकांच्या आस्थापनांचीही तपासणी केली जाणार आहे. खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबतही लवकरच माहिती दिली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नळजोडणी पूर्णपणे बंद; महापालिकेचा मोठा निर्णय!
फराळ, मिठाई आणि चिवड्याचीही तपासणी
दिवाळीच्या काळात मिठाई, चकली, चिवडा आणि इतर फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. या पदार्थांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जाचे घटक किंवा मुदत संपलेले साहित्य वापरले जात नाही ना, याची तपासणी FDA कडून केली जाणार आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे भेसळयुक्त किंवा दर्जाहीन पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. दिवाळी संपेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
मुदत संपलेले आणि निकृष्ट पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक
मुदत संपलेले किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सणासुदीच्या काळात अशा पदार्थांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
FDA च्या या इशाऱ्यामुळे दिवाळीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी आवाहन : मिठाई, फराळाचे पदार्थ, मसाले आणि खाद्यतेल खरेदी करताना उत्पादनाची मुदत, पॅकेजिंग, उत्पादकाची माहिती आणि परवाना तपशील तपासावेत. संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास संबंधित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी.




