TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा पेच! सतेज पाटलांच्या आघाडीने शशिकांत युचेकरांची केली निवड; प्रशासकाला पत्र देणार

समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित, महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित; गणपूर्तीअभावी अधिकृत निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, प्रशासकाच्या निर्णयाकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने शशिकांत पाटील युचेकर यांची बहुमताच्या आधारे अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा दावा केला आहे. मात्र, आवश्यक गणपूर्तीअभावी अधिकृत बैठकीत निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याने या निवडीच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रशासक यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समविचारी आघाडीचा बहुमताच्या आधारे निवडीचा दावा

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने सभेत आवश्यक गणपूर्ती होऊ शकली नाही. त्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील युचेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा दावा केला.

आमच्याकडे बहुमत असून, त्याच आधारे युचेकर यांना अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, गणपूर्तीचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थता दर्शवली, असे समविचारी आघाडीकडून सांगण्यात आले.

‘साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल कसा नाकारणार?’

आमदार सतेज पाटील यांनी या प्रकरणावर भूमिका मांडताना समविचारी आघाडीकडे बहुमत असल्याचा दावा केला. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनादेशाचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

शशिकांत पाटील युचेकर यांची बहुमताच्या आधारे निवड करण्यात आली असून, प्रशासकाने त्यांना अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवावा, अशी मागणी करणारे पत्र देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पुढील बैठकीला सर्व संचालकांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकारण तापलं; एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

गोकुळमध्ये संख्याबळाचे राजकारण

गोकुळच्या सत्तासंघर्षात समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आल्याचा, तर महायुतीकडे १२ संचालक असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन स्वीकृत संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका राहण्याची चर्चा होती.

मात्र, महायुतीच्या संचालकांच्या अनुपस्थितीमुळे अध्यक्षपदाची अधिकृत निवड प्रक्रिया रखडली. समविचारी आघाडीने स्वतंत्र बैठकीत केलेली निवड प्रशासक आणि संबंधित निवडणूक यंत्रणा मान्य करणार का, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.

प्रशासकाच्या निर्णयाकडे लक्ष

गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत पुढील बैठक सुमारे १५ दिवसांनी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याआधी समविचारी आघाडी प्रशासकाला पत्र देणार असल्याने प्रशासकाची भूमिका निर्णायक ठरू शकते.

समविचारी आघाडीने केलेल्या निवडीला अधिकृत मान्यता मिळते का, निवड प्रक्रिया पुन्हा राबवली जाते का किंवा अन्य कोणता निर्णय घेतला जातो, यावर गोकुळमधील पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button