पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन नळजोडणी पूर्णपणे बंद; महापालिकेचा मोठा निर्णय!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यावर निर्बंध; नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनाही नवीन नळ कनेक्शन नाही; आयुक्त विजय सूर्यवंशी यांची माहिती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत नागरिकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना नवीन नळजोडणी देणे बंद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे शहरातील नवीन गृहप्रकल्प आणि नळजोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांपुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात आधीच १० टक्के पाणीकपात
पिंपरी-चिंचवड शहरात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट महापालिकेसमोर आहे. अशा परिस्थितीत नवीन नळजोडणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाणीपुरवठ्यावरील निर्बंध आणखी कठोर झाले आहेत.
बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले पाणी बंधनकारक
शहरातील सुरू असलेल्या तसेच नवीन बांधकाम प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी महापालिकेकडून विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. बांधकामांसाठी टँकरच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा – विधान परिषद निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘आम्ही आत्मपरीक्षण करू’
पाणीगळती आणि चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम
शहरातील पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील मोठ्या प्रमाणावरील पाणीगळती आणि अनधिकृत वापर हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य वितरण आणि पाणीबचत करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
नवीन गृहप्रकल्पांसमोर पाणीपुरवठ्याचे आव्हान
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असून, नवीन गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. अनेक भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच नवीन नळजोडण्यांवरील निर्बंधांमुळे बांधकाम व्यावसायिकांसह सदनिकाधारकांनाही पर्यायी पाणीव्यवस्थेचा प्रश्न भेडसावू शकतो.
दरम्यान, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
नवीन नळजोडणी बंद करण्याच्या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना राबवते, याकडे लक्ष लागले आहे.




