पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा: मोना अग्रवालची सुवर्ण कामगिरी, अवनी लेखराचे रौप्यपदक

Asian Para Games 2026 | जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पॅरा नेमबाजांनी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी करत पदकांचे दिमाखदार खाते उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवत दुहेरी यश मिळवले; ज्यात मोना अग्रवालने सुवर्णपदक, तर अवनी लेखराने रौप्यपदक आपल्या नावे केले.
अंतिम फेरीत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत मोना अग्रवालने २५० गुणांची विक्रमी कमाई करत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. यासह तिने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, यापूर्वीचा विक्रम भारताच्याच अवनी लेखराच्या नावावर होता. अवनीने २४९.६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. २०२२ च्या स्पर्धेत सहाव्या स्थानावर राहिलेल्या मोनाने यंदा थेट सुवर्णवेध घेतला. पात्रता फेरीतही मोनाने ६२९.१ गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला होता, तर अवनी दुसऱ्या स्थानी राहिली होती.
अवनी लेखराची २०२८ पॅरालिम्पिकसाठी पात्रता निश्चित
या रौप्यपदकासह अवनी लेखराने लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेचे अधिकृत तिकीट निश्चित केले आहे. मोना अग्रवालने याआधीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून पॅरालिम्पिक कोटा आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा
टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना राजस्थानमधून अटक; पोलिसांची धडक कारवाई
कोण आहे मोना अग्रवाल?
राजस्थानच्या सीकर येथील मोना अग्रवालचा जन्म ८ नोव्हेंबर १९८७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या नवव्या महिन्यात तिला पोलिओची लागण झाली आणि दोन्ही पायांवर कायमस्वरूपी परिणाम झाला. मात्र, शारीरिक मर्यादांना झुगारून तिने क्रीडा क्षेत्रात अद्भूत झेप घेतली.
नेमबाजीकडे वळण्यापूर्वी मोनाने पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा पॉवरलिफ्टिंग आणि सिटिंग व्हॉलीबॉलमध्येही छाप पाडली. २०१९ मध्ये तिच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने पहिल्या राष्ट्रीय सिटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. डिसेंबर २०२१ मध्ये रायफल नेमबाजीला सुरुवात करणाऱ्या मोनाने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला. २०२३ मध्ये तिने दक्षिण कोरियातील विश्वचषकात १० मीटर एअर रायफल SH1 प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. दोन मुलांची आई असलेल्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत खेळणाऱ्या मोनाच्या या अद्वितीय योगदानासाठी तिला २०२४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.




