“माफी माग, नाहीतर कुटुंब उद्ध्वस्त करू”; टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी

मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या जीवघेण्या गोळीबारानंतर बॉलिवूडमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असतानाच, आता या टोळीशी संबंधित अनिल पंडित याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे. यामध्ये त्याने अभिनेता सलमान खानला थेट जीवे मारण्याची आणि त्याचे संपूर्ण कुटुंब संपवण्याची उघड धमकी दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल पंडित सलमान खानला उद्देशून अत्यंत आक्रमक भाषेत म्हणतो, “सलमान खान, माझं बोलणं नीट ऐक; जर तू माझा मोठा भाऊ लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई समाजाची माफी मागितली नाहीस, तर आम्ही तुझ्या घरात एक श्वानही शिल्लक ठेवणार नाही. आम्ही तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू, हे लक्षात ठेव. तुझ्याकडे सुरक्षा (सिक्युरिटी) आहे म्हणून तुला काही होणार नाही, अशा भ्रमात राहू नकोस.”
हेही वाचा
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा: मोना अग्रवालची सुवर्ण कामगिरी, अवनी लेखराचे रौप्यपदक
टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) गाडीवर रविवारी संध्याकाळी तीन हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. “आम्ही दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणारे आणि सलमान खानसोबत काम करणारे बॉलिवूडमधील सर्वजण आमच्या निशाण्यावर असतील; त्यांचा पुढचा नंबर असेल,” अशी उघड धमकीही या पोस्टमधून देण्यात आली होती.
तिन्ही शूटर जेरबंद
दरम्यान, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून शिताफीने अटक केली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा व्हायरल ऑडिओ क्लिप तसेच बिश्नोई गँगच्या सोशल मीडिया पोस्टचा कसून तपास करत आहेत.




