न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे दोन वेगवेगळे एकदिवसीय संघ जाहीर; शुबमन गिल, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

India Squad For New Zealand Tour | आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाच सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंट आणि आगामी कसोटी मालिकेची तयारी लक्षात घेता बीसीसीआयने पहिल्या तीन सामन्यांसाठी आणि अखेरच्या दोन सामन्यांसाठी दोन स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत. पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व शुबमन गिल करणार असून, उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. या मालिकेनंतर लगेचच १९ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची महत्त्वाची कसोटी मालिका सुरू होणार आहे. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत अवघ्या तीन दिवसांचे अंतर असल्याने कसोटी संघातील प्रमुख खेळाडू शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती घेणार आहेत.
हेही वाचा
अमेरिकेकडून रशियावरील निर्बंध आणि शुल्कात तात्पुरती सवलत; भारताला फायदा, इंधन स्वस्त होणार?
त्यामुळे अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात चार मोठे बदल करण्यात आले आहेत. नियमित कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज हे खेळाडू शेवटच्या दोन सामन्यांत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी कुमार कुशाग्र, यश ठाकूर, तिलक वर्मा आणि आकिब नबी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या ३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा (फिटनेसवर अवलंबून).
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.




