जंतर मंतरवर आंदोलनांना बंदी? केंद्र सरकारने आंदोलनस्थळांच्या यादीतून केले वगळले; आता तीन पर्यायी ठिकाणे निश्चित
रामलीला मैदान, बुराडी आणि सीबीडी ग्राउंडवर आंदोलनांना परवानगी देण्याची तयारी; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने मागितली होती परवानगी

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर मंतर हे अनेक वर्षांपासून आंदोलनांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. मात्र, आता केंद्र सरकारने आंदोलनांसाठी निश्चित केलेल्या स्थळांच्या यादीतून जंतर मंतरला वगळल्याची माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार, दिल्लीतील रामलीला मैदान, बुराडी ग्राउंड आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी ग्राउंड ही आंदोलनांसाठी पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी मिळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गृह मंत्रालयाने आंदोलन आणि धरणे आयोजित करण्यासाठी पर्यायी ठिकाणे निश्चित करण्याच्या उद्देशाने समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी आंदोलने आयोजित करण्याची प्रक्रिया आणि नियम याबाबत सुधारित प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) स्वतंत्रपणे जारी केली जाणार आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, नव्या व्यवस्थेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत.
सीजेपीच्या आंदोलनाच्या मागणीमुळे चर्चेला वेग
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने २० जून ते २५ जुलै या काळात आंदोलन केले होते. या ३६ दिवसांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणही केले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर २५ जुलै रोजी आंदोलन संपल्याचा दावा करण्यात आला होता.
हेही वाचा – ऊसदराचा तिढा दिल्लीत; तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र-कर्नाटकात राजू शेट्टींचे तीव्र आंदोलन
संसदेजवळील अंतरामुळे सुरक्षेचा प्रश्न?
जंतर मंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, संसद भवनापासून जंतर मंतरचे अंतर सुमारे दीड किलोमीटर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे.
जून-जुलैमध्ये सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांना रोखण्यासाठी संसदेची प्रवेशद्वारे बंद करावी लागल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळांच्या व्यवस्थेबाबत नव्याने विचार करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सीजेपी पुन्हा जंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागत असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील नेतेही तेथे धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
रामलीला मैदानासह तीन पर्यायी ठिकाणे
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या पर्यायी ठिकाणांमध्ये रामलीला मैदान, बुराडी ग्राउंड आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी ग्राउंड यांचा समावेश आहे. रामलीला मैदान हे संसद भवनापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे, तर बुराडी आणि सीबीडी ग्राउंड दिल्लीच्या इतर भागांत आहेत.
९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयातही जंतर मंतरला पर्याय म्हणून मोठ्या जागेचा शोध घेण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. अशा ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असाव्यात, यावर भर देण्यात आला होता.
१९९३ पासून जंतर मंतरला आंदोलनस्थळ म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतर विविध सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्नांवरील आंदोलने येथे झाली आहेत. आता या ठिकाणाबाबतच्या नव्या व्यवस्थेमुळे आंदोलनकर्त्यांना कोणत्या अटींवर आणि कुठे आंदोलन करता येईल, हे सुधारित SOP आणि संबंधित अधिकृत आदेशांनंतर स्पष्ट होणार आहे.




