TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर हल्ले; दोन भारतीय खलाशी बेपत्ता

‘एमटी पेट्रो डॉल्फिन’वरील नऊ भारतीय खलाशांची सुटका; दुसऱ्या जहाजावरील सर्व ११ भारतीय सुरक्षित, भारताकडून हल्ल्यांचा निषेध

Strait of Hormuz Ship Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यांमध्ये ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या तेलवाहू जहाजावरील दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू असून, भारताचे मस्कत येथील दूतावास ओमानच्या प्रशासनाशी समन्वय साधत आहे. या घटनेमुळे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नऊ भारतीय खलाशांची सुटका

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमटी पेट्रो डॉल्फिन’ या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या जहाजावर एकूण ११ भारतीय खलाशी होते. त्यापैकी दोन जण बेपत्ता झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते.

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमानमधील सोहर अँकरेज परिसरात या तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाला. जहाजावरील नऊ भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून ते सुरक्षित आहेत. उर्वरित दोन खलाशांचा शोध घेण्यासाठी स्थानिक तटरक्षक दलाकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे सोनोवाल यांनी स्पष्ट केले. भारतीय खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक समन्वय साधला जात आहे.

हेही वाचा –  सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनलचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

दुसऱ्या जहाजावरही हल्ला; सर्व भारतीय सुरक्षित

‘एमटी व्हॅलथेरा’ या मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावरही अज्ञात प्रक्षेपकाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागल्याची माहिती समोर आली. मात्र, या जहाजावरील सर्व ११ भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.

दोन जहाजांवरील हल्ल्यांमुळे या सागरी मार्गावरून होणाऱ्या व्यापारी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तेलवाहू जहाजांना लक्ष्य केले जाणे हे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

भारताचे हल्ल्यांचा निषेध; तणाव कमी करण्याचे आवाहन

व्यापारी जहाजांवर वारंवार होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. अशा घटनांमुळे आधीच तणावपूर्ण असलेली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असून, सागरी वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका भारताने मांडली आहे.

भारतीय खलाशांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून सागरी मार्गांवरील वाहतूक सुरक्षित ठेवण्याची गरज भारताने अधोरेखित केली आहे.

जागतिक स्तरावरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने राजनैतिक संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवून सागरी वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे भारताने म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button