सौरव गांगुलीच्या बायोपिकच्या पोस्टरवरून ट्रोलिंग; राजकुमार रावने मान्य केली चूक, म्हणाला ‘टीमने यातून धडा घेतला’
‘दादा’च्या पोस्टरवर AI वापरल्याची टीका; सौरव गांगुलींसोबत घालवला वेळ, त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेतल्याचा राजकुमार रावचा खुलासा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव सध्या आगामी बायोपिक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित ‘दादा : द सौरव गांगुली स्टोरी’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. मात्र, चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरील एडिटिंगवरून सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. पोस्टरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केल्याचा आरोपही काही नेटकऱ्यांनी केला. आता या ट्रोलिंगवर राजकुमार रावने प्रतिक्रिया देत पोस्टर तयार करताना घाई झाल्याचे मान्य केले आहे.
सौरव गांगुलींसोबत अनेक विषयांवर चर्चा
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार रावने ‘दादा’ चित्रपटाच्या तयारीबाबत माहिती दिली. सौरव गांगुली यांची अनेकदा भेट घेतल्याचे सांगताना त्याने कोलकात्यातील शूटिंगच्या आठवणीही शेअर केल्या.
राजकुमार राव म्हणाला की, त्याने सौरव गांगुली यांच्या घरी तसेच ईडन गार्डन्समध्ये शूटिंग केले आहे. चित्रपटाच्या कामासाठी कोलकात्यात असताना त्याला गांगुली यांच्यासोबत बराच वेळ घालवण्याची संधी मिळाली. या काळात दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. काही वैयक्तिक गोष्टींवरही संवाद झाला असून, त्याबाबत आता उघडपणे सांगता येणार नसल्याचे त्याने नमूद केले.
हेही वाचा – पोटनिवडणुकीत भाजपची दोन राज्यांत मुसंडी; विजय यांच्या TVK चा तमिळनाडूत धमाका, पुदुच्चेरीत AINRC विजयी
‘त्यांनी त्यांचे आयुष्य माझ्यासमोर उलगडले’
एखाद्या व्यक्तीला आणि तिच्या विचारविश्वाला समजून घेण्यासाठी तिच्या आयुष्यातील वैयक्तिक पैलू जाणून घेणे महत्त्वाचे असते, असे राजकुमार रावने सांगितले. सौरव गांगुली यांनी त्यांच्याशी संवाद साधताना अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या आणि आपले आयुष्य त्याच्यासमोर उलगडून दाखवले, असेही त्याने म्हटले.
सौरव गांगुली यांच्याबद्दल बोलताना राजकुमार रावने त्यांना दिग्गज खेळाडू संबोधले. भारतीय क्रिकेट संघ आज ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासाचा पाया घालण्यात गांगुली यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
पोस्टरवरून ट्रोलिंग; टीमने घेतला धडा
८ जुलै रोजी सौरव गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दादा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये राजकुमार राव गांगुली यांच्या ऐतिहासिक शर्टलेस सेलिब्रेशनचा लूक साकारताना दिसला. मात्र, पोस्टरमधील एडिटिंगवरून नेटकऱ्यांनी टीका केली. पोस्टर AIच्या मदतीने तयार केल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजकुमार राव म्हणाला की, पोस्टर तयार करणाऱ्या टीमला आता या अनुभवातून धडा मिळाला आहे. कोणतेही काम घाईघाईने करण्याऐवजी त्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याची जाणीव टीमला झाली आहे, असे त्याने सांगितले.
सौरव गांगुली यांचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित चित्रपटाबाबत चाहत्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत, असे राजकुमार रावने नमूद केले. त्यामुळे ‘दादा’ चित्रपटातील त्याची भूमिका, गांगुली यांच्या आयुष्याचे चित्रण आणि आगामी पोस्टर याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.




