Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्यात कठोर बदल; डॉक्टरांवर मोक्का लावण्याची तरतूद करण्याचा सरकारचा विचार

हिवाळी अधिवेशनात सुधारणा विधेयक मांडणार; बोगस डॉक्टरांची यादी प्रसिद्ध करण्यासह पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या विक्री-वापरावरही लक्ष

मुंबई : प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४ व २००३ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये डॉक्टरांवर लावण्यात येणारी कलमे अधिक कठोर करण्यासोबतच, गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यांतर्गत कारवाई, गुन्हे सिद्धतेची प्रक्रिया आणि शिक्षेच्या तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सरकार विचार करत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील सुधारणा विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी कृती दलाच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खापरे, आमदार स्नेहा दुबे-पंडीत आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर उपस्थित होते.

राज्यस्तरीय कृती दलाचे काम जिल्हास्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. जिल्हास्तरावरून तक्रारी प्राप्त व्हाव्यात यासाठी समितीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. तसेच या कामासाठी समर्पित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा –  आरावी समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटन विकासाला गती; परवानग्या व विभागीय अडचणी दूर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

बोगस डॉक्टरांवरही कारवाई

नोंदणी नसलेल्या बोगस डॉक्टरांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करावी, जेणेकरून नागरिकांना अशा डॉक्टरांची माहिती मिळेल आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे आबिटकर यांनी सांगितले. अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर लक्ष

सध्या बाजारात पोर्टेबल सोनोग्राफी मशीन उपलब्ध असून त्याबाबत ऑनलाइन जाहिरातीही दिसून येतात. त्यामुळे अशा मशीनची विक्री आणि उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून नियमबाह्य उत्पादनांवर बंदी घालण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

पशुवैद्यकीय वापरासाठी उपलब्ध असलेल्या सोनोग्राफी मशीनचा मानवी वापरासाठी गैरवापर होत आहे का, याचीही तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा

हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. कायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींवर तातडीने कारवाई आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी राज्यस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group