पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी-चिंचवडमधील १२ हजार मतांचा प्रभाव निर्णायक ठरण्याची शक्यता

पुणे | पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
विनायक रणसुभे हे वयाच्या १६व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय असून, दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या प्रेरणेतून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. सन २००६ मध्ये काँग्रेसकडून पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळावर निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला होता.
हेही वाचा
नायझेरियामध्ये भीषण विमान अपघात! हवाई दल प्रमुखांसह ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू
त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. राजकीय कारकिर्दीसोबतच कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. कोल्हापूर ही जन्मभूमी आणि पुणे-पिंपरी-चिंचवड ही कर्मभूमी असल्याने या परिसरात रणसुभे यांचा व्यापक जनसंपर्क असल्याचे मानले जाते. विशेषतः पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांच्याशी जोडलेला मोठा मतदारवर्ग असून, सुमारे १२ हजार मतांचा प्रभाव त्यांच्या उमेदवारीला या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरवू शकतो.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणसुभे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमधील त्यांचा जनसंपर्क, दीर्घ राजकीय अनुभव आणि विविध सामाजिक चळवळींमधील सहभाग पाहता त्यांची उमेदवारी निर्णायक ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




