अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची सुरेल मैफल
बालगीतांच्या बहारदार सादरीकरणाला बच्चेकंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गणपती उत्सवाच्या आठवणींपासून चिमणीने भुकेल्या कावळेदादासाठी आणलेला पाव, दूध पिणारी मनीमाऊ, प्राण्यांना घेऊन धावणारी झुकझुक गाडी, डुलत चालणारा हत्तुल्या आणि कोंबडीच्या पिल्लांची शिकवणी अशा विविध विषयांवरील गोड, निरागस आणि मनोरंजक बालगीतांनी आचार्य अत्रे रंगमंदिराचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. बालगीतांच्या या सुरेल मैफलीला शालेय विद्यार्थ्यांसह बच्चेकंपनीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ अंतर्गत सुप्रसिद्ध गीतकार, गायिका आणि संगीतकार भारती न्यायाधीश यांच्या विशेष बालगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विजय न्यायाधीश यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बालगीतांच्या मैफलीची सुरुवात ‘या हो या, या हो या गणपती बाप्पा लवकर या’ या उत्साहवर्धक गीताने झाली. त्यानंतर भारती न्यायाधीश यांच्यासह बालकलावंत ध्वनी गुप्ता, ईरा चायनाखवा आणि शौर्यवी मांडवगडे यांनी विविध बालगीते सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली.
हेही वाचा
पुणे शिक्षण विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कार्यक्रमादरम्यान ‘आमच्या घरची मनीमाऊ’, ‘कावळेदादा काव काव’, ‘झुक झुक झुक निघाली जंगलक्वीन’, ‘हत्तुल्या रे हत्तुल्या’, ‘कोंबडीने शिकविले पिल्लाला’ यांसारख्या लोकप्रिय बालगीतांना विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. गीतांमधील गोड शब्द, तालबद्ध संगीत, विनोदी आशय आणि बालसुलभ कल्पनाशक्ती यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
बालगीतांच्या माध्यमातून लहान मुलांना मराठी भाषेतील शब्दसंपदा, लय, ताल, कल्पनाशक्ती आणि संस्कृतीची सहज ओळख करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. मनोरंजनासोबतच मराठी भाषेबद्दल मुलांच्या मनात आपुलकी आणि अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या अखेरीस ‘डुबी डुबी डम डम’ या उत्साही गीताने बालगीतांच्या मैफलीची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह आणि उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महानगरपालिकेचे ग्रंथालय समन्वयक प्रवीण चाबुकस्वार, प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, किशोर केदारी आणि साळवे यांचे सहकार्य लाभले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी आणि नव्या पिढीपर्यंत मराठीची गोडी पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये बालगीतांच्या या मैफलीने विशेष रंग भरला.




