ब्लॅकमेल करून अभियंता तरुणीवर बलात्कार, फ्लॅटही बळकावला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/crime-01-..jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अश्लील फोटोच्या आधारे संगणक अभियंता असणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केल्याची आणि फ्लॅटचा अर्धा हिस्सा बळकावल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये अलिशान भागात उघडकीस आली आहे. बलात्कार करणा-या संबंधीत तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या कृत्यात नराधमाच्या पत्नीची देखील साथ होती, असे 29 वर्षीय पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित तरुणी ही गेल्या आठ वर्षांपासून तरुण उर्फ शिबू सिद्दीकी याला ओळखते. शिबूने या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. या आधारे तो तरुणीला ब्लॅकमेल करु लागला. त्याने पीडितेवर बलात्कार केला. तसेच, पिंपळे सौदागरमधील तिचे राहते घरही बळकावले. त्याने फ्लॅटचा अर्धा हिस्सा बक्षीस पत्राद्वारे नावावर करून घेतला आहे.
या कृत्यात त्याला पत्नी रक्षी शिबु सिद्दीकीचीही साथ होती. या घटनेची बाहेर वाच्यता केल्यास ठार मारु, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. मात्र, हे अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने शेवटी सांगवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडित तरुणी ही गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमधील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. तर, आरोपी दाम्पत्य हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गोविंदपूरचे रहिवासी आहेत. या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग या अधिक तपास करत आहेत.