TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुपाली चाकणकर-रुपाली ठोंबरे आमनेसामने; सावित्रीबाईंच्या विचारांवरून नव्या चर्चेला सुरुवात

‘सावित्रीची लेक म्हणण्याची पात्रता नाही’ म्हणत ठोंबरे पाटलांची टीका; अशोक खरात प्रकरणावरून दोन्ही रुपालींमध्ये पुन्हा जुंपली

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चाकणकर यांनी स्वतःची तुलना सावित्रीबाई फुले यांच्याशी केल्यानंतर ठोंबरे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर चाकणकर यांनीही ठोंबरे पाटील यांच्यावर बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे.

“कोणी लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही,” असा टोला रुपाली चाकणकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना लगावला. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही नेत्यांमधील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांच्या ‘सावित्रीची लेक’ या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे, रुपाली चाकणकर तुमची पात्रता नाही सावित्री माईंचे नाव घेण्याची,” असे त्या म्हणाल्या. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी आयुष्य वेचले, असा दाखला देत त्यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा –  रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने शरीराला काय होते? हृदयापासून डोळ्यांपर्यंत मिळतात ‘हे’ फायदे

अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत ठोंबरे पाटील यांनी महिला आयोगाच्या तत्कालीन भूमिकेवरही टीका केली. महिलांना आधार देण्याची जबाबदारी असताना त्याच महिलांना कथित भोंदूबाबाच्या जाळ्यात पोहोचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप ठोंबरे पाटील यांच्या वक्तव्याचा भाग आहेत.

दरम्यान, चाकणकर यांनी स्वतःवरील आरोप फेटाळताना आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. “रुपाली चाकणकर लढत आहे, कारण ही महाराष्ट्राची लेक आहे. खोट्या आरोपांना त्या बळी पडणार नाहीत,” असे त्यांनी सांगितले होते.

तसेच, “चारित्र्यावर उडणारे शिंतोडे २०० वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी सहन केले होते. आजही ही रुपाली सावित्रीची लेक म्हणून लढत आहे,” असेही चाकणकर यांनी म्हटले होते.

आता चाकणकर यांच्या ‘लाली लिपस्टिक’ या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक संघर्षाला पुन्हा धार आली आहे. अशोक खरात प्रकरणानंतर सुरू झालेला हा वाद आता सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या वापरावरूनही रंगला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group