ज्ञानेश कुमार यांना तात्काळ तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई | विशेष सखोल मतदार पडताळणी (SIR) आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत फूट पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात इतर दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “राजकीय पक्ष फोडणाऱ्या आणि लोकशाहीचा खून करणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार आहेत, त्यांना तातडीने तुरुंगात टाकले पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची मनमानी सुरू होती, याची आज पुष्टी झाली, पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार हे ज्ञानेश कुमार आहेत. आज ज्ञानेश कुमारांचा विद्रूप चेहरा सर्वांच्या समोर आला आहे. तातडीने ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाका.
हेही वाचा
निवडणूक आयोगातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; “कारभार अदृश्य हातांत”, काँग्रेसचा घणाघात
मागील काही वर्षांपासून आम्ही सर्व विरोधक निवडणूक आयोगाच्या किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानीपणे चालणाऱ्या कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. आज ते खरं होताना दिसत आहे. आज ज्याला खरं बंड म्हणतात, निवडणूक आयोग हा या दोन (संधू आणि जोशी) आयुक्तांचा झाला आहे. त्यामुळे या दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आयोगातून काढलं आहे असं मानायला हरकत नाही. कारण या दोन आयुक्तांचं बहुमत झालं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भारतात एक टोळी हौदोस घालत आहे. ही टोळी राजकीय पक्ष फोडणं, दुसऱ्यांचे राजकीय पक्ष चोरणं, लोकशाहीचा खून करणं, अशी ही टोळी कारभार करत आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. त्यामुळे तातडीने ज्ञानेश कुमारांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती? हे लोकांना आता कळलं आहे. असं बोललं जातं की निवडणूक आयोग केंद्रीय गृहखात्याच्या सूचना मानतो. मग याचे सूत्रधार गृहमंत्री आहेत का? याचाही खुलासा झाला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.




