ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC: ड प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन अग्निशमन केंद्राच्या कामाला गती द्या!

माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

नवीन केंद्रासाठी जागा तातडीने हस्तांतरित करा; विद्यमान केंद्रातील वाहने व मनुष्यबळ वाढविण्याचीही सूचना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, नव्याने विकसित होणारी गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि उंच इमारतींची वाढ लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्षम व तत्पर अग्निशमन यंत्रणा उभारणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ‘ड’ प्रभागांतर्गत प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करून केंद्राच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

ड प्रभागाच्या हद्दीत लोकवस्ती आणि बांधकामांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आग किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दल घटनास्थळी कमीत कमी वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागेचे हस्तांतरण अद्याप प्रलंबित असल्यास ते तातडीने पूर्ण करावे. त्यानंतर सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया जलदगतीने पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी भूमिका नाना काटे यांनी मांडली.

नवीन अग्निशमन केंद्र निर्धारित कालावधीत पूर्ण करून लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करावे. हे केंद्र सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद आणि प्रभावी अग्निशमन सेवा उपलब्ध होईल. परिणामी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; प्रवेशद्वाराच्या कमानीचा स्लॅब कोसळला

विद्यमान केंद्रावर अतिरिक्त वाहनांची गरज

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन केंद्रावर आवश्यकतेच्या तुलनेत अग्निशमन वाहनांची संख्या अपुरी आहे. एखादे वाहन अन्य ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी गेले असल्यास केंद्रावर तत्काळ वापरासाठी वाहन उपलब्ध नसण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर आवश्यक संख्येने अग्निशमन वाहने कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यासाठी महापालिकेने योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अधिकारी आणि जवानांची संख्या वाढवा

केवळ वाहनांची संख्या वाढवून उपयोग होणार नसून, त्यासाठी प्रशिक्षित अग्निशमन अधिकारी, जवान, वाहनचालक आणि आवश्यक तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध असणे गरजेचे आहे. उपलब्ध वाहनांचा प्रभावी वापर करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विद्यमान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी सूचनाही नाना काटे यांनी केली.

विशेष लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करा

नवीन केंद्रासाठी जागा हस्तांतरित करणे, प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे, बांधकामाला गती देणे, विद्यमान केंद्रातील अग्निशमन वाहने वाढविणे आणि आवश्यक मनुष्यबळ कायमस्वरूपी उपलब्ध करणे या सर्व बाबींवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. हा विषय नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“ड प्रभागात लोकसंख्या, गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि उंच इमारतींची संख्या वेगाने वाढत आहे. आपत्कालीन परिस्थितीत काही मिनिटांचा विलंबही नागरिकांच्या जीवित व मालमत्तेसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रस्तावित अग्निशमन केंद्रासाठी जागा तातडीने हस्तांतरित करून केंद्राचे काम वेळेत पूर्ण करावे. तसेच विद्यमान केंद्रावर पुरेशी वाहने, अधिकारी आणि जवान कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावेत.”

— नाना काटे
माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group