अमेरिका-इराण युद्ध भडकणार? सीमेवर सैन्याची प्रचंड जमवाजमव; इराणच्या सशस्त्र दलांना ‘कोड १००’ अलर्ट

Iran US War | अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला असतानाच, इराणने आपल्या भूसेनेतील बहुतांश तुकड्या देशाच्या सीमावर्ती भागात तैनात केल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे संभाव्य भूदल आक्रमण रोखण्यासाठी इराणने मक्रान किनारपट्टीवर, विशेषतः ओमानच्या आखातालगतच्या दक्षिणेकडील भागात तोफखाना, यांत्रिक तुकड्या आणि जलद प्रतिसाद पथके (Quick Response Teams) मोठ्या प्रमाणावर सज्ज केली असल्याचे इराणी वृत्तसंस्था ‘फार्स’ने म्हटले आहे.
अमेरिकन सैन्य दक्षिणेकडील सागरी मार्गाने देशात घुसखोरी करू शकते, असा संशय इराणला आहे. त्यामुळे ओमानच्या आखाताला लागून असलेल्या मक्रानच्या सामरिक किनारपट्टीवर संरक्षण फळी भक्कम करण्यात आली आहे. इराणकडे सुमारे साडेचार लाख सैनिकांचे बळ असून, त्यातील विशेष दले आणि रणगाडा तुकड्यांना सीमेवर धाडण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सीमेवर तैनात जवानांचा नेमका आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
हेही वाचा
Asian Games: भारतीय महिला संघाचा अंतिम सामना कोणाविरुद्ध आणि किती वाजता? जाणून घ्या..
या मोठ्या लष्करी हालचालींपूर्वी इराणने आपल्या सर्व लष्करी तुकड्यांना ‘कोड १००’ वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. हा इराणच्या सशस्त्र दलांमधील सर्वोच्च लष्करी सतर्कतेचा इशारा (हाय-अॅलर्ट) मानला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध निर्णायक वळणावर असून आपण लवकरच “मोठा निर्णय” घेणार असल्याचा इशारा दिल्यानंतर इराणनेही युद्धाची पूर्ण तयारी सुरू केली आहे.
“अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांनाही सोडणार नाही”; इराणची ताकीद
दरम्यान, आपल्याकडे गुप्त माहिती असून त्यानुसार नव्याने मोठा लष्करी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा इराणच्या लष्कराने केला आहे. हा नवीन हल्ला झाल्यास अमेरिकेच्या लष्करी तळांवर थेट व सडेतोड प्रहार केला जाईल, असा सज्जड दम इराणने भरला आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिकेला तळ किंवा सहकार्य देणाऱ्या शेजारील देशांनाही युद्धात सहभागी मानून त्यांच्यावरही हल्ले केले जातील, असा उघड इशारा इराणने दिला आहे.





