‘आत्महत्येला नकार, जीवनाला होकार’चा विद्यार्थ्यांनी केला संकल्प
पिंपरी चिंचवड विद्यापीठात मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम; तज्ज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पिंपरी-चिंचवड | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने पिंपरी चिंचवड विद्यापीठ, मावळ येथे ‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’ या विषयावर मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि भावनिक अडचणींबाबत मोकळेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे अध्यक्ष लायन संदेश मुखेडकर यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पूना निगडी, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी आणि लायन्स क्लब ऑफ पुणे देहूरोड यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे आणि लायन्स इंटरनॅशनलचे विभाग ३ चे विभागीय अध्यक्ष एमजेएफ लायन सलीम शिकलगार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हा मानसिक आरोग्य व कल्याण अध्यक्ष एमजेएफ लायन रश्मी नायर तसेच विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता व विभागप्रमुख प्रा. रुचू कुथियाला याही उपस्थित होत्या.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण आणि मानसशास्त्रज्ञ तथा ‘हीलिंग हार्ट्स कौन्सेलिंग सर्व्हिसेस’चे संस्थापक डॉ. सौरभ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मानसिक आरोग्य, तणाव, नैराश्य, भावनिक अडचणी आणि आत्महत्येचे विचार याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मनातील अडचणी विश्वासू व्यक्तीजवळ व्यक्त करणे, मदतीची गरज ओळखणे आणि योग्य वेळी मानसोपचारतज्ज्ञ अथवा समुपदेशकाची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा
एमजेएफ लायन सलीम शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना लायन्स इंटरनॅशनलच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली. समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासोबतच देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लिओ क्लबमध्ये सहभागी होऊन सामाजिक सेवाकार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तज्ज्ञांसोबत मनमोकळा संवाद साधला आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न विचारले. ‘जीवन अमूल्य आहे आणि आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही,’ हा संदेश कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘आत्महत्येला नकार, जीवनाला होकार’ हा सकारात्मक संदेश स्वीकारत जीवनाला प्राधान्य देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे सचिव लिओ लायन अश्विन गुडसुरकर, खजिनदार प्रदीप रॉय, लायन संदीप मोरे, लिओ अध्यक्ष भूषण तरकसे, लिओ अभिषेक आडे आणि लिओ लिऑन कुटिन्हो उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्ष लायन शिल्पी कुमार व लिओ अथर्व, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचे अध्यक्ष लायन अतुल बोरुळे व लायन शैलजा सांगळे तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे देहूरोडचे सचिव लायन व्यंकटथलापती यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सन्निध्या मिसाळ आणि रुची चंदन यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांशी समन्वय साधणे, त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे आणि आयोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
समारोपप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे अध्यक्ष लायन संदेश मुखेडकर यांनी उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सहभागी लायन्स व लिओ सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल पिंपरी चिंचवड विद्यापीठ प्रशासनाचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये आशा, आधार आणि जीवनमूल्यांचा सकारात्मक संदेश रुजविणारा हा उपक्रम ठरला.




