ऑस्करच्या शर्यतीत मराठी डंका! ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘गोंधळ’ची अधिकृत निवड

मुंबई | जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ (Gondhal) ची निवड करण्यात आली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही ऐतिहासिक घोषणा केली. देशभरातील विविध भाषांमधील ३० हून अधिक मातब्बर चित्रपटांमधून दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पदार्पणातील या चित्रपटाने ऑस्करचे तिकीट पटकावले आहे.
एफएफआयचे अध्यक्ष अभय सिन्हा, सचिव धर्मेंद्र मेहरा, खजिनदार संग्राम शिरके आणि अध्यक्ष पी. शेषाद्री यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली. या शर्यतीत ‘बॉर्डर २’, ‘इक्कीस’, ‘धुरंधर १ व २’, ‘बायसन’, ‘देऊळबंद २’, ‘बालन’, ‘डोरोथी’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारख्या भव्य बजेट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या चित्रपटांचा समावेश होता. या सर्व तगड्या चित्रपटांना मागे टाकत महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘गोंधळ’ने बाजी मारली.
हेही वाचा
ममता बॅनर्जींचे नवे चिन्ह ‘फुटबॉलपटू’; पक्षाचे नावही बदलले, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
हा चित्रपट महाराष्ट्राच्या शतकानुशतके चालत आलेल्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककलेवर आणि धार्मिक विधीवर आधारित आहे. लग्नानंतर वधू-वराच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट मानवी भावना, श्रद्धा-अंधश्रद्धा आणि समाजातील बदलत्या दृष्टिकोनांचा प्रभावी वेध घेतो. भव्य सादरीकरण आणि तांत्रिक उत्कृष्टतेमुळे या चित्रपटाने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे.
गोव्यात ‘सिल्व्हर पीकॉक’ने गौरव
संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाचा हा पहिलाच चित्रपट असून कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती दीक्षा डावखर यांनी केली आहे. गोव्यातील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (IFFI) मध्ये प्रिमियरदरम्यान या चित्रपटाला प्रतिष्ठेचा ‘सिल्व्हर पीकॉक’ (विशेष ज्युरी पुरस्कार) मिळाला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे आणि कैलास वाघमारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.





