TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गोकुळ निवडणुकीवरून महायुतीत पुन्हा ठिणगी; हसन मुश्रीफांचा धनंजय महाडिकांवर निशाणा

आमच्या सदस्यसंख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला’; गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे मुश्रीफांचे स्पष्ट संकेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत सदस्यसंख्या आणि संस्थांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, या वादामुळे नाराज झालेल्या संस्थांची समजूत काढली जाईल आणि महायुतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडणार नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केला.

“आमच्या संस्था कशा कमी होतील, आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल आणि त्यांची कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न झाले. पण आमच्या सदस्यसंख्या कशा जास्त राहतील, यासाठी आम्ही प्रयत्न केला. या सर्व प्रकरणामुळे काही संस्थांची नाराजी असणार आहे. ती आम्ही दूर करू,” असे मुश्रीफ म्हणाले.

गोकुळ निवडणुकीत महायुतीतील घटकांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू असताना, “कोण काय बोलण्यापेक्षा महायुती जिंकून येणार आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा कोणताच पडणार नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही’

गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मुश्रीफ यांनी फेटाळून लावली. “गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल, असे मला वाटत नाही. नेत्यांच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य आहे. महायुती म्हणून निवडणूक होईल आणि महायुतीच जिंकेल,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अद्याप बैठक झालेली नसल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ७ ऑक्टोबरपूर्वी फडणवीस यांच्यासोबत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  दापोडी परिसरामध्ये नाले सफाई मोहीम

अपात्र संस्थांवरूनही राजकारण

गोकुळमधील अपात्र संस्थांच्या मुद्द्यावर बोलताना मुश्रीफ यांनी या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य यांच्या सुमारे ७५ टक्के संस्था असल्याचा दावा केला. सुमारे १५ टक्के संस्था काँग्रेसच्या असल्याचे सांगत या संस्था वाचवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही पदवीधर जागांवर महायुतीचा विजय होईल’

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही मुश्रीफ यांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले. मागील चार निवडणुकांमध्ये पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिल्याचे त्यांनी सांगितले. भैय्या माने यांचे शैक्षणिक काम चांगले असून राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.

दरम्यान, शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपकडून मागितली जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून मंगेश चिवटे यांचे नावही चर्चेत असल्याचे ते म्हणाले. चिवटे यांची समजूत काढण्यात यश आले आणि राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली, तर दोन्ही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button