म्हाळुंगे-बालेवाडीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा; १,०३२ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
भारत कराटे अकॅडमीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंचा सहभाग; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पंचांच्या देखरेखीखाली रंगला थरार

पुणे : श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे भारत कराटे अकॅडमीच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल १,०३२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, लिडकॉमचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, नईम बागबान यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान मुळशी तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्रीडा सभापती कैलास कुटे, मुळशी तालुका सभापती मंदाताई शेळके, माजी सभापती सागर साखरे, पिंपरी-चिंचवड कराटे संघटनेचे अध्यक्ष योगेश मोरे, नगरसेविका पल्लवी जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
हेही वाचा – मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला गिरीश महाजनांचा विरोध; म्हणाले, “गणेशोत्सवात ही वेळ योग्य नाही”
शिस्तबद्ध वातावरणात स्पर्धा
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पंचांच्या देखरेखीखाली स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. विविध कराटे प्रकारांमध्ये सहभागी खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेदरम्यान भारत कराटे अकॅडमीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. नवोदित खेळाडूंना मोठ्या स्पर्धांचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
खेळाडूंना घडविण्यासाठी सातत्याने उपक्रम
भारत कराटे अकॅडमी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य कराटे प्रशिक्षण संस्था असून, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन भारत कराटे अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक, पालक, खेळाडू तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आयोजकांनी आभार मानले.




