MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; मुख्यमंत्री फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयांची घोषणा
परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती; गंभीर तक्रारी असलेल्या परीक्षांच्या फेरतपासणीपर्यंत मुलाखती स्थगित

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांमधील घोळ आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या राज्यभरातील विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्या संवेदनशीलतेने ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. ‘आम्हाला संपूर्ण प्रणाली सुधारायची आहे, काहीही लपवायचे नाही. हा तपास शेवटच्या टप्प्यापर्यंत नेला जाईल,’ असा विश्वास फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला.
MPSC परीक्षा पद्धतीत मोठे बदल
MPSCच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ IAS अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेणार आहे.
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणासह गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ची सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व संशयास्पद परीक्षांचीही विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक तपास अहवाल होणार सार्वजनिक
विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी गुन्हे शाखेचा प्राथमिक तपास अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे. तसेच माहिती अधिकारांतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत आयोगाला शिफारस केली जाणार आहे.
ज्या परीक्षांबाबत गंभीर तक्रारी आहेत, त्यांची फेरतपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित परीक्षांच्या मुलाखती थांबवण्यात येणार आहेत. मुलाखत प्रक्रियेसाठी निश्चित मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली जाणार आहेत.
हेही वाचा – ISRO ची जागतिक भरारी; भारताच्या अंतराळ मोहिमांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
PMC, MMRDA भरतीचीही चौकशी
MPSCसोबतच PMC आणि MMRDA भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी MPSCमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ‘समर्पित तक्रार निवारण कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेतील अडचणी आणि तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
पोलीस भरतीतही तांत्रिक पर्याय
पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दोन्ही पायांना चिप लावण्यासह इतर तांत्रिक पर्यायांचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यभर पोलीस भरतीसाठी एकसमान गुणपद्धती लागू करण्यावरही भर देण्यात आला आहे.
याशिवाय ‘सारथी’, ‘बार्टी’ आणि ‘महाज्योती’शी संबंधित प्रलंबित प्रश्नांवरही तोडगा काढण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
येत्या आठ दिवसांत या सर्व निर्णयांच्या कालबद्ध अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.




