‘भाऊ लढाईच्या मैदानात असताना जेवायला कसा येणार?’; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंचं उत्तर
‘भाऊबीजेला बहिणीकडे नक्की जाणार’; मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जरांगेंची भूमिका

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा १३वा दिवस आहे. उपोषणादरम्यान जरांगे सातत्याने सरकारवर टीका करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘मनोज जरांगे माझे भाऊ आहेत. मी त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण देते’, असं त्यांनी म्हटलं होतं. आता जरांगेंनी अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याला उत्तर दिलं आहे.
‘भाऊ लढाईच्या मैदानात असताना बहिणीने जेवायला बोलवू नये’
अमृता फडणवीस यांच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, “अमृताताईंनी सांगितलं आहे ना, जेवायला जाऊ. पण भाऊबीजेला. आता आंदोलन आहे ना, आता बोलवू नये. भाऊ मैदानात असताना बहिणीने जेवायला बोलवू नये. भाऊ संकटात असतो, बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा.”
“आमच्या बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं. आम्ही साडी-चोळी घेऊन जाऊ, हा मनोज जरांगेचा शब्द आहे. लढाईच्या मैदानातून जेवायला बोलवत असाल तर हार पत्करावी लागेल. ताईंनी तो विचार, तो दृष्टिकोन आणि मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी,” असंही जरांगे म्हणाले.
हेही वाचा – रिक्षाचालकांचा प्रश्न ऐकून मार्ग काढला; संजय राऊतांकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक
‘आत्ता ती वेळ नाही’
“एखादा माणूस चांगल्या भावनेने विषय मांडत असेल तर त्यावरून चिडण्याची आवश्यकता नाही. ताईंनी ज्या भावनेने, ज्या मायेने बोलावलं आहे ते मान्य आहे; पण आत्ता ती वेळ नाही. संकटात असल्यानंतर जेवायला नाही बोलवलं जात. भावाचं नातं आहे म्हटल्यावर भाऊबीजेला जेवायला जाणार. आज मात्र माझ्या मराठा लेकरांसाठी मी लढतोय. ताईंकडे नंतर जाणार,” अशी भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली.
अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?
नागपूरमधील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी, “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत. मी त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण देते,” असं त्यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीसांची आरक्षणाबाबत भूमिका
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठा समाजाला आरक्षण देताना संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असलेले सर्व पर्याय तपासले जातील. कोणाच्या ताटातले काढून कोणाच्या ताटात टाकणारे आम्ही नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“सर्व समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. संविधानात ज्या बाबींची तरतूद आहे, त्या निश्चितपणे दिल्या जातील. मराठा समाजासाठी आतापर्यंत जे निर्णय घेतले, सवलती दिल्या त्या आम्हीच दिल्या असून, मराठा समाजाला न्याय हेच सरकार देणार,” अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली आहे.




