Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आधुनिक सुविधांनी युक्त चित्रनगरी उभारणार

मुंबई | महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.

कलात्मक दृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्याने पुढे जात आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि डॉ.राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अखंड संगीतसेवा करत स्वतंत्र संगीतविश्व निर्माण केले. ज्ञानेश्वर माऊली, वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांच्या संगीतनिर्मितीतून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाली. ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ तसेच ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी पंडितजींच्या योगदानाचे कौतुक केले.

सलीम-जावेद या जोडीने आणि सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रभावी नायक आणि अजरामर व्यक्तिरेखा निर्माण केल्या. ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांच्या लेखनाचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

More cinema halls will be made available for Marathi films; Chief Minister Devendra Fadnavis.

हेही वाचा

गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या वेळेत वाढ; अनंत चतुर्दशीला सलग २४ तास अखंड सेवा!

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या अभिनयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणारे प्रसाद ओक हे कलेच्या क्षेत्रातील ‘३६० डिग्री मॅन’ आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांची त्यांनी साकारलेली भूमिका अत्यंत प्रभावी असल्याचे सांगून त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या असून ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांतून स्त्रीकेंद्री भूमिका प्रभावीपणे मांडल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारणार : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख चित्रपट नगरी म्हणूनही जगभरात आहे. मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. या परंपरेला पुढे नेत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ, कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधा यांसोबतच आता रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासन काम करत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

चित्रपटसृष्टीतील ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन कलाकार, तंत्रज्ञ व अन्य सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा जगभर पोहोचवली असून या सर्वांच्या योगदानाला आपण नमन करतो, असे ॲड. शेलार यांनी नमूद केले. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याचा उल्लेख करून त्यांच्या मानवी मूल्यांवर आधारित चित्रपटांनी रसिकांना समृद्ध केले, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात निर्माण होणारे मराठी तसेच अन्य चित्रपट अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत आणि चित्रपट निर्माते, व्यावसायिक, कलाकार व कलावंतांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

या ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शन, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण, उत्कृष्ट ध्वनीसंयोजन, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा, उत्कृष्ट बालकलाकार आदी पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button