TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाप्रसाद, भंडाऱ्यावर निर्बंध? तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंदिर महासंघाचा आक्षेप

अन्नसुरक्षेच्या नियमांना विरोध नाही; मात्र धार्मिक उपक्रमांना एकतर्फी लक्ष्य करू नका, मंदिर महासंघाची मागणी

नागपूर : राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईनंतर त्यांनी हॉटेल व्यवसायिकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यानंतर आता देवस्थान परिसरातील पेढा आणि प्रसाद विक्रीच्या दुकानांवरही FDAचे लक्ष केंद्रित झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात उघड्यावर विक्री होणाऱ्या प्रसाद आणि पेढ्यांच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. त्यानंतर मंदिरातील महाप्रसादाकडेही लक्ष दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदानावर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी निर्बंध लावले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केला आहे.

मुंढेंवर आरोप काय?

अन्नसुरक्षेचे नियम आवश्यक असले तरी ते धर्म, पंथ किंवा सणाचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्य शासनाकडे केली आहे. महासंघ आणि शहरातील विविध मंदिरांच्या विश्वस्तांच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले.

आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबतही नियमांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

हेही वाचा –  आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आता ‘रिपोर्ट कार्ड’; तीन वर्षांच्या कामगिरीवर श्रेणी निश्चित

अन्नसुरक्षेला विरोध नाही, मात्र…

नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे महत्त्वाचे आहे. त्याला आपला विरोध नसल्याचे मंदिर महासंघाने स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित सूचनांमध्ये हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ आणि ‘अन्नदान’ यांचा विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी आणि कारवाईचा इशारा देण्यात येत असल्याचा दावा महासंघाने केला आहे.

अन्नसुरक्षेचे नियम लागू करताना कोणत्याही एका धर्माच्या सण-उत्सवांना लक्ष्य करणे योग्य नाही. कायद्याची अंमलबजावणी सर्व धर्म आणि समुदायांसाठी समान असावी, अशी भूमिका महासंघाने मांडली.

सेवाभावी उपक्रमांवर व्यावसायिक निकष नको

मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून आणि सेवाभावातून आयोजित केले जाणारे महाप्रसाद, भंडारे आणि अन्नदान हे धार्मिक तसेच सामाजिक परंपरेचा भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यावर व्यावसायिक खाद्यविक्रीचे निकष लावून अनावश्यक प्रशासकीय बंधने आणू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्नाची सुरक्षितता राखताना सेवाभावी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना अडथळा निर्माण होणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी, असेही महासंघाने म्हटले आहे.

निवेदन देताना दिलीप कुकडे, चंद्रकांत भोपे, प्रदीप पांडे, नंदकुमार पिंपळे, अधिवक्ता अभिषेक तिवारी, अतुल अर्वेनला यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group