MPSC पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; दोषींवर कठोर कारवाई होणार
स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांची भेट; परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षिततेबाबत विविध मागण्या मांडल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन देताना सांगितले की, MPSC पेपरफुटीच्या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा
परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि भक्कम करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, त्यामध्ये UPSCचे माजी सदस्य, पोलीस महासंचालक, IITचे प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ही समिती राज्यातील विविध विभागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परीक्षेशी संबंधित अन्य घटकांशी संवाद साधून सूचना व अभिप्राय घेणार आहे. पुण्यातही समिती भेट देणार आहे.
हेही वाचा – गोव्यातील नागरिकांना मोठा दिलासा! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत; 9 सप्टेंबरपासून योजनेची अंमलबजावणी
औषध निरीक्षक पेपरफुटीचा तपास वेगाने
औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहाहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणाचाही सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर शिक्षा केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या कष्टांवर अन्याय होऊ देणार नाही
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे आणि परीक्षा व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास कायम राहावा, यासाठी सरकार आवश्यक सुधारणा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून प्रत्यक्ष परीक्षा घेण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक बदल केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन हे बदल तातडीने अंमलात आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.




