“जेव्हा केव्हा काही होत राहिल, तेव्हा कळत राहिल”; ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य
शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाला अधिकार; दसरा मेळावा होणार असल्याचाही शिंदेंकडून स्पष्ट संकेत

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत आले आहे. शिंदेसेनेने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांना आपल्या गटात घेतले होते. त्यानंतर सचिन अहिर यांनाही पक्षात प्रवेश देऊन विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिंदेसेना पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ राबवणार का, याबाबत उत्सुकता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ कार्यक्रमात याबाबत सूचक वक्तव्य केले. ‘ऑपरेशन टायगरचा गिअर कोणता आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अधिकाराचा उल्लेख केला.
“पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही राज्यात महायुतीत, तर देशात एनडीएमध्ये आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘ऑपरेशननंतर आमचा स्पीड सगळ्यांना कळलाच’
ऑपरेशन टायगरनंतर शिंदेसेनेचा वेग सर्वांना कळला आहे. “यानंतर जेव्हा केव्हा काही होत राहिल, तेव्हा कळत राहिल,” असे सूचक वक्तव्य शिंदे यांनी केले. त्यामुळे आगामी काळात पुन्हा राजकीय ‘ऑपरेशन’ होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
पक्ष मजबूत होण्यासाठी कार्यकर्ते, संघटना आणि लोकांमध्ये जाऊन केलेले काम महत्त्वाचे असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. पक्षाची ध्येयधोरणे पाहून लोक पक्षात येतात. तसेच अडचणीच्या काळात पक्ष आणि नेता कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो, तेव्हा पक्षाची ताकद वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता CBIकडे; आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळले
‘मुख्यमंत्री म्हणून कधी वागलो नाही’
आपल्या कार्यशैलीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असतानाही आपण स्वतःला सामान्य माणसापासून वेगळे मानले नाही. “मी मुख्यमंत्री असताना लोकांमधीलच होतो. मुख्यमंत्री म्हणून कधी वागलो नाही, कॉमनमॅन म्हणून वागलो,” असे त्यांनी सांगितले.
दसरा मेळावा होणार
दरम्यान, दसरा मेळाव्याबाबतही शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिले. दसरा मेळावा होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. “२०२२ ला आम्ही ऑपरेशन केले. ऑपरेशन करायला मी डॉक्टर नाही. डॉक्टर नसलो तरी छोटी-मोठी ऑपरेशन सुरू असतात,” असे म्हणत त्यांनी राजकीय घडामोडींवर मिश्कील भाष्य केले.
त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या या सूचक वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आगामी काळात पुन्हा कोणते राजकीय ‘ऑपरेशन’ करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





