ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एसटीपी शुल्कावरून संजीवन सांगळे आक्रमक; “सोसायटीधारकांवर निर्णय लादला तर तीव्र आंदोलनाचा इशारा”

भाजपाने पाशवी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याचा फेडरेशनचा आरोप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो गृहनिर्माण सोसायट्या आणि लाखो नागरिकांवर थेट आर्थिक परिणाम करणाऱ्या एसटीपी व जलनिःस्सारण जोडणी शुल्काचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याने वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सोसायटीधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशनशी कोणतीही सविस्तर चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केला आहे.

दि. २ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ४ अंतर्गत एसटीपी व जलनिःस्सारण जोडणी शुल्कासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावातील अनेक महत्त्वाच्या बाबी अद्याप स्पष्ट नसताना आणि त्याचा थेट आर्थिक परिणाम सोसायटीधारकांवर होण्याची शक्यता असताना कोणतीही पुरेशी चर्चा न करता प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप सांगळे यांनी केला आहे.

“शहरातील हजारो सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांशी संबंधित विषयावर त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशनशी चर्चा न करता निर्णय घेणे योग्य नाही. नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यापूर्वी प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी या निर्णयातील प्रत्येक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका संजीवन सांगळे यांनी मांडली.

दरम्यान, शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा खर्च भागविणे आणि त्याचा अनावश्यक आर्थिक भार नागरिकांवर न टाकणे, यामध्ये महापालिका प्रशासनाने समतोल साधण्याची गरज आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या या प्रस्तावावर प्रशासन आता फेडरेशनसोबत चर्चा करणार का आणि अंमलबजावणीपूर्वी प्रस्तावातील संदिग्ध बाबी दूर करणार का, याकडे शहरातील हजारो सोसायटीधारकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

दुहेरी शुल्क आकारणीचा प्रश्न

सदर प्रस्तावामुळे एसटीपी व जलनिःस्सारणासाठी दुहेरी शुल्क आकारले जाणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी फेडरेशनकडून करण्यात आली आहे.

तसेच जुन्या गृहप्रकल्पांच्या बाबतीत विकसकांची जबाबदारी काय असणार, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे. विकसकांनी निर्माण केलेल्या प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचा आर्थिक भार भविष्यात सोसायटीधारकांवर टाकला जाणार असेल, तर त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका सांगळे यांनी घेतली आहे.

“सोसायटीधारकांना वेठीस धरू नका”

जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांचे जोडणी शुल्क नेमके कोण भरणार, हा देखील कळीचा मुद्दा आहे. याशिवाय स्वतःच्या एसटीपीची योग्य देखभाल करून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या पर्यावरणपूरक सोसायट्यांना शुल्कामध्ये सवलत किंवा प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे का, हेही महापालिकेने स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे सांगळे यांनी नमूद केले.

शुल्काच्या माध्यमातून महापालिकेकडे जमा होणाऱ्या निधीचा वापर नेमका कोणत्या कामांसाठी केला जाणार, त्यावर देखरेख कशी ठेवली जाणार आणि त्यामध्ये पारदर्शकता कशी राखली जाणार, याची माहिती नागरिकांना देणे आवश्यक असल्याचेही फेडरेशनचे म्हणणे आहे.

संजीवन सांगळे यांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन सर्व मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे.

“सोसायटीधारकांच्या माथी कोणताही अन्यायकारक आर्थिक भार लादला जात असेल, तर चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन शांत बसणार नाही. आधी फेडरेशनशी चर्चा करा, नागरिकांचे म्हणणे ऐका आणि त्यानंतरच निर्णयाची अंमलबजावणी करा. अन्यथा या निर्णयाच्या निषेधार्थ फेडरेशनच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारावे लागेल..

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी- चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button