‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’; आदिवासी विद्यार्थ्यांना मंत्री झिरवळांचा अजब सल्ला
पुण्यात १४ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण; विधानानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ‘सॉरी’ म्हणत झिरवळांचा काढता पाय, विरोधकांकडून टीका

पुणे : विविध मागण्यांसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “आंदोलन करायचे असेल तर खाऊन-पिऊन करा. मीदेखील आंदोलन करताना चोरून खायचो,” असा अजब सल्ला झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू झाली असून विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ आंदोलनस्थळी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना झिरवळ यांनी आंदोलनाबाबत हा सल्ला दिला.
“तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर जेवण करून करा, खाऊन-पिऊन करा. मीही अनेक आंदोलने केली आहेत. आंदोलन करताना मी चोरून, लपून खायचो. तुम्ही खूप कडक आंदोलन करत आहात. कृपया स्वतःच्या जीवाचे नाहक हाल करू नका,” असे झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
हेही वाचा – Meta New Rule : १८ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक-इन्स्टाग्रामवर नवे निर्बंध
मात्र, त्यांच्या “चोरून खायचो” या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित झाला.
झिरवळ यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. “१४ दिवस तुम्ही कुठे होतात?”, “खाऊन आंदोलन करण्याचे तुम्ही समर्थन करता का?” अशा प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी केला. यावर झिरवळ यांनी ‘सॉरी’ म्हणत तेथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रात्री चर्चेनंतर काही निर्णयापर्यंत पोहोचलो असल्याचे झिरवळ यांनी सांगितले. मात्र आंदोलनस्थळी गेल्यावर आपल्याविरोधात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“आंदोलक आपलेच आहेत. ते हक्काने बोलतात. त्यामुळे त्यांची समजूत घालून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू,” अशी भूमिका झिरवळ यांनी मांडली.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जबाबदारीबाबतही त्यांनी भाष्य केले. “आमचे खाते धरले तर आमच्याच खात्यात आम्हाला पेच पडला आहे. कधी कोण नंबर लावून बसेल, याचा काही भरोसा नाही,” असेही ते म्हणाले.
झिरवळ यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, “तुम्ही खाऊन-पिऊन आंदोलन करा, असा संदेश झिरवळ यांना द्यायचा असेल, त्यामुळे ते तसे बोलले असावेत,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी झिरवळ यांच्या विधानावर भाष्य करताना, हे वक्तव्य त्यांच्या स्वभावाप्रमाणे असल्याचे म्हटले. तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी झिरवळ यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच मंत्री नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.




