श्री दादा महाराज नाटेकर विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात संपन्न

चिखली, पुणे | डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबतच सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री दादा महाराज नाटेकर विद्यालय, देहू-आळंदी रोड, चिखली येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आणि एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मजबूत संकेतशब्द तयार करणे, अनोळखी व संशयास्पद लिंक ओळखणे, फिशिंग आणि विशिंगपासून सावध राहणे, डिजिटल पाऊलखुणा, सार्वजनिक वाय-फाय वापरताना घ्यावयाची काळजी, ओटीपी सुरक्षितता, द्वि-घटक प्रमाणीकरण आणि सायबर अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून फसवणुकीचे संदेश, कॉल किंवा लिंक कशा ओळखाव्यात, ओटीपी व वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, सार्वजनिक वाय-फाय वापरताना संवेदनशील व्यवहार टाळावेत तसेच ऑनलाइन खात्यांच्या सुरक्षिततेसाठी द्वि-घटक प्रमाणीकरणाचा वापर करावा, याबाबत माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला.
हेही वाचा
या जनजागृती सत्राचे मार्गदर्शन एमआयटी एसीएससी, आळंदी येथील सायबर वॉरियर टीममधील:
गायत्री सरोदे– सायबर वॉरियर
स्वाती शिंगाडे – सायबर वॉरियर
या कार्यक्रमास श्री दादा महाराज नाटेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वैशाली नरवडे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि एमआयटी एसीएससी, आळंदीचे प्राध्यापक समन्वयक (फॅकल्टी कोऑर्डिनेटर) मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.
सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंची माहिती घेतली. सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारून स्वतःसोबतच कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही सायबर धोक्यांबाबत जागरूक करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
जागरूक विद्यार्थी, सुरक्षित डिजिटल भविष्य आणि जबाबदार डिजिटल समाज घडविण्याच्या दिशेने हे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र महत्त्वपूर्ण ठरले.




