पिंपरीत सेल्समनचाच कारनामा; बनावट चावीने दुकान उघडून २८ हजारांचे शर्ट लंपास

पिंपरी | कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बनावट चावीच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप उघडून शटर उघडले आणि दुकानातील तब्बल २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याची घटना पिंपरीतील कपडा बाजार परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०६ तसेच भा.दं.वि. कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा सुरूच राहणार : कामगार नेते यशवंत भोसले
पिंपरीतील बी-१९/०५, कपडा बाजार येथील ‘प्रगती ड्रेसेस एन एक्स’ या दुकानात ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या राजेश नंदलाल लुंडवानी (वय ४७, रा. बौद्धनगर, पिंपरी) याने जवळील बनावट चावीचा वापर करून दुकानाचे कुलूप उघडले. त्यानंतर शटर उघडून दुकानात प्रवेश केला आणि २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आकाश राजेश जवराणे (वय ३३, व्यवसाय कपडा विक्री, रा. वैभवनगर फेज-२, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा ९ ऑगस्ट रोजी रात्री १०.५० वाजता दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.




