ब्राह्मणांना आरक्षण द्या; गुजरातमध्ये मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Brahmins-gujarat.jpg)
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर आता देशभरात विविध समाजात आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. गुजरातमधील राजपूत आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय आयोगाकडे ब्राह्मण आणि राजपूत संघटनांनी धाव घेतली आहे. गुजरातमध्ये राजपूत समाजाचे प्रमाण ८ टक्के असून आम्हाला आठ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी राजपूत समाजाच्या नेत्यांनी केली आहे. तर , अशी मागणी ब्राह्मण संघटनांनी केली आहे.
समस्त गुजरात ब्राह्मण समाजाने ओबीसी आयोगाला पत्र पाठवले आहे. यात त्यांनी ब्राह्मण समाजात सर्वेक्षण करुन त्यांचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे नेते यज्ञेश दवे यांनी सांगितले की, गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण असून एकूण लोकसंख्येत ब्राह्मणांचे प्रमाण ९ टक्के आहे. यातील ४२ लाख लोक ही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ब्राह्मणांचा ओबीसीत समावेश करणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.
तर गुजरातमधील राजपूत समाज संघटनेने ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. राजपूत गारसिया समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे. राजपूत गारसिया समाजातील महिलांचे उत्पन्न कमी आहे. तसेच हा समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत आणि शिक्षणात पुरेशी संधी मिळत नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. राजपूत गारसिया समाजाचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ८ टक्के आहे. मराठा समाजाच्या धर्तीवर आम्हालाही ८ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.