शनिवारी महाराष्ट्रात वादळी पावसाचा तडाखा? विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुणे | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक भागांत उकाडा वाढला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या मान्सूनला बळ देणारी कोणतीही मोठी हवामान प्रणाली सक्रिय नसली, तरी वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने शनिवारी (१८ जुलै) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
जुलै महिना हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, जुलैचा पंधरवडा उलटून गेला तरीही राज्यात अजूनही सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस झालेला नाही. बहुतांश भागांत जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात आतापर्यंत सरासरी २४ टक्के कमी पाऊस झाला असून, यामुळे चिंतेचे वातावरण आहे. यंदाच्या मान्सूनवर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ (El Nino) स्थितीचा प्रभाव राहणार असल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले असून, त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, २० जुलैनंतर राज्यातील हवामानात बदल होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा
‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
शनिवारी वादळासह विजांचा कडकडाट होणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मात्र, शनिवारी या वादळी पावसाचा प्रभाव अधिक वाढणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
शनिवारी ‘यलो अलर्ट’ कुठे?
सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया आदी भागांमध्ये शनिवारी वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे तसेच सांगली, कोल्हापूर, ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, धुळे आणि जळगाव आदी भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





