मुंबईत अदानीकडून वीजबिलात अतिरिक्त शुल्क नाही – ऊर्जामंत्री बावनकुळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/Electricity.jpg)
मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीची कसलीही वीज दरवाढ राज्य वीज नियामक आयोगाने आता मंजूर केलेली नाही. तरीही या कंपनीकडून ग्राहकांच्या वीज बिलात नियमबाह्य़ पैसे आकरले गेल्याची तक्रार असेल तर बैठक घेऊ व तसे आढळल्यास पैसे ग्राहकांना परत देण्यात येतील असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली केली जाणार नाही किंवा शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणार नाही, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली.
आ. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री बोलत होते. अदानीतर्फे ग्राहकांच्या बिलात कोणताही अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राज्यात भारनियमन केले जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. यासाठी २० लाख टन परदेशी कोळसा आयात करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त डब्ल्यूसीएल, एमसीएल, एसईसीएल या कंपन्यांकडून अतिरिक्त कोळसा पुरवठय़ाची मागणी करण्यात आली आहे. कोयनेचे पाणीही जपून ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्यात कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाईल.
खासगी वीज कंपन्यांकडून दीर्घकालीन करार केलेले आहेत. पण अडीअडचणीच्या वेळेस या कंपन्या वीजपुरवठा करण्यात असमर्थता दाखवतात. अशा वेळेस या कंपन्यांकडून दंड घेणार का, या प्रश्नाच्या उत्तरात ऊर्जामंत्री म्हणाले कोळशाच्या तुटवडय़ामुळे खासगी कंपन्यांनाही नुकसान सोसावा लागला आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यामुळे अशा प्रकाची कारवाई करता येत नाही. महावितरणने अल्पकालीन करारही केले आहेत. वीज खरेदीची प्रक्रिया ऑनलाइन आहे.