“सरकार रामाची तिजोरी लुटताना..”; सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका

मुंबई | नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या प्रदीर्घ उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन साडेआठ किलोने घटले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या गंभीर परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करत भाजप सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटले जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार?
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचे एक बरे असते की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून… pic.twitter.com/cOD5Z4KSaR
— Raj Thackeray (@RajThackeray) July 16, 2026
हेही वाचा
‘शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे पुढे म्हणाले, लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचे कौतुक वाटले. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आले की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलने केली पण सरकारने काहीही केले नाही.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचे द्योतक म्हणून दाखवायचे आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवले जात आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंनी सामान्य लोकांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मिडीयावर अडकायला लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजाण समाज राजकारणपासून दूर जाऊन लाईक्स, शेअर यातच अडकला आहे.
मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावे, सजग व्हायला हवे, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील. पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसे झाले तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.





