बायोपिक अलर्ट! डॉ. अब्दुल कलाम, व्ही. शांताराम ते इलैयाराजा; आगामी काळात प्रदर्शित होणार दिग्गजांच्या आयुष्यावर आधारित ‘हे’ ९ चित्रपट, वाचा यादी…

Upcoming Biopic’s : गेल्या काही वर्षांत सातत्याने चरित्रपटांना प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसतं. विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट आपल्या भेटीला आले आहेत. येत्या काळातही असे अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटु सौरव गांगुली यांच्या बायोपिकचं पहिलं पोस्टर रिलीज झालं. यामधील सौरव यांच्या भूमिकेतील राजकुमार रावच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधलं आणि मोठ्या प्रमाणात त्याची चर्चाही झाली. अशातच आता यासह विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत्या काळात आपल्या भेटीला येणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार आगामी काळात भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं स्थान असलेले आणि या इंडस्ट्रीच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असलेले दिवंगत व्ही शांताराम यांच्यापासून ते तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यापर्यंत अशा अनेक लोकप्रिय व्यक्तींवर आधारित चित्रपट रिलीज होणार आहेत. आगामी काळात आपल्या भेटीला येणाऱ्या चरित्रपटांमधून मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नट व नटी झळकणार आहेत. यामध्ये आर.माधवन, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, दाक्षिणात्य अभिनेता धनुष अशा अनेकांचा समावेश आहे. हे चित्रपट कोणते आहेत आणि ते कधी रिलीज होणार आहेत याबद्दल जाणून घेऊया…
GDN – भारतातील महान संशोधक गोपालस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांना ‘एडिसन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखलं जातं. या चित्रपटात आर. माधवनने गोपालस्वामी नायडू यांची भूमिका साकारली आहे. कृष्णकुमार रामकुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजासाठी नायडू यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा प्रवास या चरित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात जयराम, सत्यराज, प्रियमणी आणि दुशारा विजयन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
ईठा – दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर श्रद्धा कपूर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात ती तमाशा आणि लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज लोककलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विठाबाईंचा संघर्ष, महाराष्ट्राच्या लोककलेचं जतन करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान आणि बाळंतपणानंतर पुन्हा रंगमंचावर नृत्य सादर करण्याचा त्यांचा जिद्दीचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा – पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी – या चित्रपटात राजकुमार राव यांनी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या न्यायालयीन लढाया आणि विशेषतः २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याच्याविरोधातील खटल्यात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तर या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबची भूमिका साकारणार आहे. अविनाश अरुण यांनी या चरित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
White – या चित्रपटात विक्रांत मॅस्सीने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारली आहे. मोंटू बस्सी दिग्दर्शित आणि सिद्धार्थ आनंद निर्मित हा चित्रपट कोलंबियामधील युद्ध शांततेच्या मार्गाने संपवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर आधारित आहे. संवाद आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची ही गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. हा चित्रपट यावर्षीच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
कलाम : द मिसाईल मॅन ऑफ इंडिया – हा चित्रपट भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चरित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुषने डॉ. कलाम यांची भूमिका साकारली असून, ओम राऊतने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून मिळालेली ओळख आणि त्यानंतर देशाचे ११ वे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट डॉ. कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या आत्मचरित्रावर प्रेरित आहे. चित्रपट यावर्षीच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
व्ही. शांताराम – हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चरित्रपटात बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने व्ही. शांताराम यांची भूमिका साकारली आहे. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मूकपटांच्या काळापासून बोलपट आणि रंगीत चित्रपटांच्या युगापर्यंतचा व्ही. शांताराम यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. नोव्हेंबर २०२६मध्ये हा चरित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
राकेश मारिया बायोपिक – हा चित्रपट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आधारित आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या तपासांचा, विशेषतः १९९३ मुंबई बॉम्बस्फोट आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षीच्या अखेरीस चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
इलैयाराजा (Ilaiyaraaja) – हा चित्रपट दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चरित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुषने इलैयाराजा यांची भूमिका साकारली आहे. तामिळनाडूमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास, चेन्नईत केलेला संघर्ष, संगीतविश्वात मिळवलेलं अढळ स्थान आणि पद्मभूषण तसंच पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारांपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.





