“पुणे-नाशिक रेल्वेसाठी आता सुधीर मुंगसे यांची जनआंदोलनाची हाक!
- राजगुरुनगर-चाकण मार्गाने पुणे-नाशिक रेल्वेची मागणी - शिक्षण, रोजगार, उद्योग आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी आणि विशेषतः राजगुरुनगर-चाकण मार्गाचा समावेश व्हावा, यासाठी आता जनआंदोलनाची गरज असल्याचे मत मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुधीर विठ्ठल मुंगसे यांनी व्यक्त केले आहे. “पुणे-नाशिक रेल्वे हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, तो शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती आणि संपूर्ण परिसराच्या आर्थिक प्रगतीचा महामार्ग आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुंगसे यांनी प्रसिद्ध केलेल्या जनजागृती मोहिमेत नागरिकांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर का जावे लागते? तरुणांना नोकरीसाठी दररोज तासन्तास प्रवास का करावा लागतो? शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी अधिक वेळ आणि खर्च का सहन करावा लागतो? या सर्व प्रश्नांचे उत्तर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात दडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, राजगुरुनगर-चाकण मार्गाने रेल्वे सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळेल. युवकांना पुणे आणि नाशिक दरम्यान रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, चाकण आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींना थेट रेल्वे संपर्क मिळाल्याने उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल.
हेही वाचा – ‘देऊळ बंद-२’च्या निमित्ताने नगरसेवक राहुल कलाटे यांचा मराठी संस्कृतीच्या जतनासाठी पुढाकार!
शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी माल कमी वेळेत मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचेल, वाहतूक खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्यास मदत होईल. याशिवाय, रेल्वेमुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होऊन अनेक कुटुंबे एकत्र राहू शकतील, असेही मुंगसे यांनी नमूद केले.
मुंगसे यांनी नागरिकांना एकत्र येऊन लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे या प्रकल्पासाठी ठाम भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. “आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
“पुणे-नाशिक रेल्वे हा केवळ रेल्वे ट्रॅकचा विषय नाही. हा आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, तरुणांच्या रोजगाराचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आणि उद्योगांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. राजगुरुनगर-चाकण मार्गासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे आवाज उठवला, तरच हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल.”
– सुधीर विठ्ठल मुंगसे, संस्थापक-अध्यक्ष, मी सेवेकरी सोशल फाउंडेशन.
महत्त्वाचे मुद्दे :
- पुणे-नाशिक रेल्वेमुळे काय होणार?
- विद्यार्थ्यांना जलद आणि सुरक्षित प्रवास.
- युवकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी.
- चाकण आणि राजगुरुनगर औद्योगिक पट्ट्याला चालना.
- शेतमालाची वाहतूक कमी खर्चात आणि कमी वेळेत.
- रिअल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन.
- कुटुंबांचे स्थलांतर कमी होऊन सामाजिक स्थैर्य वाढणार.





