Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में…”; मुंबईतील पाऊस अन् मिसिंग लिंकच्या मुद्द्यांवरून फडणवीसांचं शेरो-शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच गेल्या चार दिवसांपासून मुंबई-पुण्यासह राज्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी झाडे पडून नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याची घटना घडली. यासह आदी घटनांवरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, आता विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सविस्तर भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईतील पाऊस, जुन्या झाडांबाबत मुंबई महापालिकेला सरकारने दिलेले निर्देश, मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याची घटना यासह आदी मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांना शेरो-शायरीतून प्रत्युत्तर दिलं आहे.

“आपण ६ जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, जुलै महिन्यात कुलाबा ७३४ मिलिमीटर, सांताक्रुझ या ठिकाणी ८५६ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, यावेळी फक्त ६ दिवसांत कुलाब्यात ८८२ मिलिमीटर आणि सांताक्रुझला ९८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे, म्हणजे संपूर्ण जुलै महिन्यात १११ टक्के आणि १०२ टक्के पाऊस झालेला आहे. पण यावेळी फक्त चार दिवसांच्या पावसाचा विचार केला, तर तो जवळपास ९० टक्के पाऊस चार दिवसांमध्ये झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात २,३१८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो, त्याच्या ४२ टक्के पाऊस हा फक्त ६ दिवसांत झालेला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा –  दशावतार, नमन, खडी गंमत, झाडीपट्टी कलाकारांचे अनुदान दुप्पट होणार; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

“पूर नियंत्रणासाठी मुंबईत ५४७ पंप कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त एमएमआरडीए, रेल्वे आणि इतर सर्व यंत्रणांच्या पंपाचा विचार केला तर ९९० पंप आहेत. यामध्ये ६ मोठे पंपिंग स्टेशन आणि १० छोटे पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. तसेच मुंबईत यावर्षी जी नालेसफाई झाली, त्याचा रेषो हा पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळा सुरू असताना १० टक्के पावसाळा संपल्यानंतर १० टक्के अशा पद्धतीने आपण करतो. नालेसफाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आलेला आहे. ११२ टक्के गाळ आपण काढला आणि मिठी नदीतून देखील ८३ टक्के गाळ काढण्यात आलेला आहे. नालेसफाईमध्ये याआधी सातत्याने घोटाळे व्हायचे. आपल्याला सर्वांना माहितीये की जेव्हा मागे एक घोटाळा बाहेर आला होता, तेव्हा नालेसफाईमधून निघालेला गाळ हा ज्या वाहनांमधून नेण्यात आला, त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये काही स्कूटर, रिक्षा आणि काही चांगल्या कार असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता अशा प्रकारे खोटे दावे करणं आणि खोटी माहिती देणं बंद झालेलं आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या हद्दीतील जुन्या झाडांबाबत मुंबई मनपाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

“कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रणामात गाजला. पण मला कधी-कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक असे आहेत, एखादे कोटी लोक मेल्यानंतर ते पैदा झालेत. खोटं बोलायला यांना लाजही वाटत नाही. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी ते टिव्हीवर येऊन खोटं बोलतात. खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालं हे सर्वांना माहिती आहे. पण ⁠महायुती सरकारची हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला”, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईतील पाऊस, मिसिंग लिंकच्या मुद्द्यांसह आदी मुद्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी शेरो-शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले, त्यामुळे आम्ही निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं की हे शक्य आहे. आपण हे करू शकतो. आपण ते करून दाखवलं”, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button