Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमनोरंजनमहाराष्ट्र

“मराठीत चेहऱ्याला किंमत नाही; विषय दमदार असेल तरच चित्रपट चालतो” – प्रवीण तरडे

मराठी प्रेक्षक देशातील सर्वात बुद्धिमान असल्याचे मत; ‘दिग्दर्शक हाच खरा हिरो’ म्हणत स्टार सिस्टीमवरही केले भाष्य

Pravin Tarde: मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा चांगले दिवस आले असून, गेल्या सहा महिन्यांत दोन मराठी चित्रपटांनी १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठी प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये चेहऱ्यापेक्षा विषयाला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा – विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; फलटण हादरले

‘द पोस्टमन’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक हाच खरा हिरो असतो. प्रेक्षक चित्रपट कोणत्या अभिनेत्याचा आहे यापेक्षा, तो कोणत्या दिग्दर्शकाचा आहे आणि त्याचा विषय काय आहे, याकडे अधिक लक्ष देतात.

यावेळी ते म्हणाले, “मराठी सिनेमामध्ये कथेलाच महत्त्व आहे. नागराज मंजुळे यांचा सिनेमा, महेश मांजरेकर यांचा सिनेमा किंवा प्रवीण तरडेचा सिनेमा असं बोललं जातं. कारण दिग्दर्शकाने विषय योग्य पद्धतीने हाताळला, तर चित्रपट सुपरहिट होतो.”

‘५० कोटींची हमी देणारा हिरो दाखवा’

मराठी चित्रपटांमधील स्टार सिस्टीमवर भाष्य करताना तरडे म्हणाले, “मराठी सिनेविश्वात असा एखादा हिरो दाखवा, ज्याचं नाव घेतलं की चित्रपट ५० कोटींची कमाई करणारच. आपल्या इथे नटांच्या बाबतीत हिरोइझम नाही. इथे कथेलाच प्राधान्य दिलं जातं.”

त्यांच्या मते, पुण्यासह महाराष्ट्रातील प्रेक्षक केवळ एखाद्या अभिनेत्याचा चेहरा पाहून चित्रपटगृहात जात नाहीत. कथा दमदार असेल तरच ते चित्रपटाला प्रतिसाद देतात.

‘मराठी प्रेक्षक सर्वात बुद्धिमान’

मराठी प्रेक्षकांचे कौतुक करताना प्रवीण तरडे म्हणाले, “या देशातला सर्वात बुद्धिमान प्रेक्षक म्हणजे मराठी प्रेक्षक. त्यांचा पैसा हा कष्टाचा आणि घामाचा असतो. त्यामुळे ते विचार करूनच चित्रपट पाहायला जातात. दया-माया दाखवून किंवा मोठा चेहरा दाखवून ते थिएटरमध्ये येत नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “चांगला विषय असेल तर हेच प्रेक्षक चित्रपटाला १०० कोटींपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत चेहऱ्याला नाही, तर विषयाला किंमत आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button