पिंपरी-चिंचवडमधील पूरपरिस्थितीवर तातडीची आढावा बैठक; कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी आमदार शंकर जगताप यांचे निर्देश

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी शहरातील पूरग्रस्त व पाणी साचणाऱ्या भागांचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले. शहरातील सर्व पूरप्रवण ‘हॉटस्पॉट्स’चे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, ज्या ठिकाणी विद्यमान पाइपलाइनची क्षमता अपुरी पडत आहे, त्या ठिकाणी भविष्यात ‘पाईप टू बॉक्स कल्व्हर्ट’ पद्धतीने नाल्यांची रचना करण्याचा प्रस्ताव तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांचा विचार करून सांडपाणी व पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी आधुनिक ‘इन्फ्रास्ट्रक्चर मास्टरप्लान’ तयार करण्यावरही भर देण्यात आला.
हेही वाचा – ‘आरटीओतील कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहरातील जुन्या नाल्यांचे पुनरुज्जीवन, नैसर्गिक जलप्रवाहातील अडथळे दूर करणे आणि निचरा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत महापालिका, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असेही सांगण्यात आले.
“पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्येक पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत. कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला दिला. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





