ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

पवना धरणातील जलसाठा वाढला; १५ टक्के पाणीकपात तातडीने रद्द करा!

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची आयुक्तांकडे मागणी : महापालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी, प्रतिनिधी : मावळ परिसरासह पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लागू करण्यात आलेली १५ टक्के पाणीकपात तातडीने रद्द करून नागरिकांना पूर्ववत पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात काटे यांनी नमूद केले आहे की, यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. उपलब्ध जलसाठा अधिक काळ पुरावा, या उद्देशाने महापालिकेने शहरात १५ टक्के पाणीकपात लागू केली होती. त्या निर्णयाला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करत नागरिकांनाही संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून मावळ तालुक्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाणीकपात कायम ठेवण्याचे कोणतेही कारण उरले नसल्याचे काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये अद्यापही कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. धरणात पाणीसाठा वाढत असताना शहरवासीयांना पाणीकपातीचा फटका बसणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धरणातील वाढता जलसाठा आणि सुरू असलेली पाण्याची आवक लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने १५ टक्के पाणीकपात तातडीने रद्द करावी, तसेच पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांना पूर्ववत, नियमित आणि पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनानंतर महापालिका प्रशासन पाणीकपातीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button