‘फुलतो जसा मोगरा’च्या सुरांनी खुलली राघवची प्रेमकहाणी! ‘स्वप्नसुंदरी’मधील प्रेमगीत प्रदर्शित

Raghav’s love story blossoms to melodies of ‘Phulto Jasa Mogra’ Romantic song from ‘Swapnasundari’ released : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ आपल्या वेगळ्या कथानकासोबतच सुरेल संगीतामुळेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. चित्रपटातील ‘फुलतो जसा मोगरा’ हे हळुवार आणि मनाला स्पर्शून जाणारे रोमँटिक गीत आता प्रदर्शित झाले असून, प्रेमाच्या नाजूक भावनांना सुंदर सुरांची साथ लाभली आहे.
या गीतातून प्रमुख कलाकार भूषण प्रधान आणि सायली पाटील यांच्यातील गोड, निरागस आणि भावस्पर्शी प्रेमकहाणी खुलताना दिसते. अभय जोधपूरकर आणि ऋषिका मुखर्जी यांच्या मधुर आवाजाने सजलेल्या या गाण्याचे बोल श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून, संगीतकार अंकुश बोराडकर यांनी त्याला सुरेल चाल दिली आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या गाण्यांनाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आता ‘फुलतो जसा मोगरा’ या गीताने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
हेही वाचा – केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
याविषयी दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणाले, ”‘स्वप्नसुंदरी’ची प्रेमकहाणी म्हणजे प्रेमाच्या प्रत्येक सुंदर टप्प्याचा भावनिक प्रवास आहे. योग्य जोडीदाराच्या शोधापासून सुरू झालेली ही कथा स्वप्नातल्या व्यक्तीच्या भेटीपर्यंत, त्यानंतर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलेल्या दोन मनांच्या नात्यापर्यंत आणि आता त्यांच्या आयुष्यात उमलणाऱ्या प्रेमाच्या हळव्या, रोमँटिक क्षणांपर्यंत येऊन पोहोचते. ‘फुलतो जरा मोगरा’ हे गाणं या प्रवासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
या गाण्यात दोन मनांमधील न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना, एकमेकांविषयीचा विश्वास, सहवासातील आनंद आणि प्रेमातील निरागसता अत्यंत सुंदर पद्धतीने उलगडते. प्रत्येक प्रेमात असे काही क्षण असतात, जे शब्दांपेक्षा नजरा आणि भावनांमधून जास्त बोलतात. ‘फुलते जरा मोगरा’ हे अगदी त्या क्षणांचं सुरेल आणि मनाला स्पर्शून जाणारं प्रतिबिंब आहे. मला खात्री आहे की, या गाण्यातील प्रेमाची ही हळवी अनुभूती प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या सुंदर आठवणीशी नक्कीच जोडून ठेवेल.”
रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे सतीश महादेव गेजगे निर्माते आहेत. अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा एका हळव्या प्रेमकथेला लग्नसंस्था, कौटुंबिक नाती आणि योग्य जोडीदाराच्या शोधाशी जोडणारा मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.





