Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत झाड कोसळण्याच्या दुर्घटनांचे सत्र सुरूच; कुर्ल्यात दुकानावर झाड पडून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबई | मुंबई आणि परिसरात झाडे कोसळून होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. कुर्ला येथील नौपाडा परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर भलेमोठे झाड कोसळल्याची गंभीर दुर्घटना रविवारी घडली. या दुर्घटनेत एका ६३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे मुंबईकरांमधून पालिकेच्या कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युनूस कुंडावाला (६३) असे या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. झाड दुकानावर कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि पालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत युनूस कुंडावाला हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवडच्या कन्यांची आशियाई तिरंदाजी स्पर्धेकडे विजयी झेप!

कुर्ल्यातील या घटनेच्या काही तास आधी, रविवारी सकाळी दादर परिसरातही एका घराच्या छतावर झाड कोसळल्याची घटना घडली. झाड पडल्याने घराचे छत तुटून मोठी फांदी थेट घरात शिरली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेले नागरिक सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सांताक्रुझ परिसरातही झाड कोसळून आठ जण जखमी झाले होते.

महिनाभरातील इतर भीषण दुर्घटना

मुंबईत गेल्या काही दिवसांत झाडे कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व झाड छाटणीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबईत झाडे कोसळून निष्पाप लोकांचे जीव जाण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नुकतीच चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून एका ११ वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

तसेच, गेल्या महिन्यात १० मे रोजी खार पश्चिमेतील लिंकिंग रोडवर एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठे झाड धावत्या रिक्षावर कोसळले होते. या भीषण अपघातात १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव या मुलीचा मृत्यू झाला होता, तर हर्षिता कुमार (२३) ही तरुणी गंभीर जखमी झाली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button