Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

हरमनप्रीत कौरच भारताची कर्णधार राहणार? T20 WC मधून बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षक अमोल मुझुमदारांचं मोठं वक्तव्य

Womens T20 World cup 2026 harmanpreet kaur: वनडेमध्ये वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला संघाला टी-२० विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातून बाहेर पडावं लागलं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारताची टी-२० विश्वचषकातील कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. संघाला दक्षिण आफ्रिका आणि अखेरीस ऑस्ट्रेलिया अशा बलाढ्य संघांविरूद्ध पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली. यानंतर आता हरमनप्रीत कौरने टी-२० संघाचं नेतृत्त्वपदावरून पायउतार व्हावं, अशी चर्चा रंगली आहे. यावर कोच अमोल मुझुमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महिला टी-२० विश्वचषकातून भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी कर्णधार हरमनप्रीत कौरवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. २८ जून रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात सोफी मोलिन्यूच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या पराभवासह भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्नही भंगलं.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अमोल मुझुमदार यांना हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. पुढेही हरमनप्रीतच संघाचं नेतृत्व करणार का, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. अंतिम निर्णय हा निवड समितीचा असेल, असं स्पष्ट करताना मुझुमदार यांनी मात्र हरमनप्रीतच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला आणि तीच पुढेही भारतीय संघाची कर्णधार राहावी, अशी भूमिका मांडली.

“‘कर्णधार कोण असेल, याचा अंतिम निर्णय निवड समिती घेईल. पण माझं थोडक्यात उत्तर द्यायचं झालं, तर हो,” असं अमोल मुझुमदार यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

हेही वाचा –  लिवर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी गाजराच्या ज्यूसमध्ये मिक्स करून प्या ‘हे’ तीन पदार्थ

यानंतर कोच अमोल मुझुमदार यांनी भारताच्या कामगिरीतील उणिवांकडेही लक्ष वेधलं. संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत अधिक आक्रमकता आणण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने आणखी १५ ते २० धावा केल्या असत्या, तर संघाची स्थिती अधिक मजबूत झाली असती, असंही त्यांनी नमूद केलं.

“संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आम्हाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्याचबरोबर फलंदाजीतही अधिक आक्रमक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही १५-२० धावा अधिक केल्या असत्या, तर त्या आमच्यासाठी मोठा आधार ठरल्या असत्या,” असं मुझुमदार म्हणाले.

भारतीय गोलंदाजी आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप अनुभवहीन असल्याचंही त्यांनी मान्य केलं. “मी याआधीही सांगितलं आहे, आम्हाला आणखी १८ महिन्यांचा वेळ द्या. त्यानंतर ही गोलंदाजीची फळी पूर्णपणे वेगळी आणि अधिक सक्षम दिसेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताने स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग विजय मिळवत केली होती. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, ‘करो या मरो’ सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर भारताने ४ बाद १७० धावा उभारूनही ऑस्ट्रेलियाने पाच चेंडू राखून लक्ष्य गाठलं आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button